विनयभंग प्रकरण; उपनिरीक्षक पवार निलंबित
By admin | Published: June 4, 2017 05:07 AM2017-06-04T05:07:29+5:302017-06-04T05:07:29+5:30
कापूरबावडी भागात १५ दिवसांपूर्वी घडलेल्या विनयभंग प्रकरणाची तक्रार नोंदवताना महिला पोलीस अधिकारी हजर नसल्याच्या हलगर्जीपणाबद्दल पोलीस उपनिरीक्षक एस.पी
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कापूरबावडी भागात १५ दिवसांपूर्वी घडलेल्या विनयभंग प्रकरणाची तक्रार नोंदवताना महिला पोलीस अधिकारी हजर नसल्याच्या हलगर्जीपणाबद्दल पोलीस उपनिरीक्षक एस.पी. पवार यांच्यावर निलंबनाची, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांच्या एक महिन्याच्या वेतनकपातीचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत. मात्र, तक्रार घेताना पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोबाइलवरील व्हिडीओ वारंवार पाहून आपला पुन:पुन्हा विनयभंग केला. या महिलेच्या आरोपात तथ्य नसल्याचे निरीक्षण चौकशी अधिकारी उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी नोंदवले आहे.
स्नानगृहात अंघोळ करतानाचे मोबाइलद्वारे चित्रीकरण करणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेशी कापूरबावडी पोलिसांनी कोणतेही गैरवर्तन केले नसल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या चौकशी अहवालात उघड झाली होती. दरम्यान, याच अहवालाची मुख्यालयाच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी पडताळणी केली. गुन्हा नोंदवताना राहिलेल्या त्रुटी, पोलिसांचे गैरवर्तन, कायदेशीर कारवाईत दिरंगाई अशा तीन बाबींची चौकशी झाली. यापैकी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्याचे चौकशीत आढळले नाही. गुन्हाही योग्य प्रकारे दाखल असून आरोपीला तत्काळ अटक झाली आहे. मात्र, विनयभंग प्रकरणात गुन्हा नोंदवताना महिला अधिकारी किंवा कॉन्स्टेबलने तो नोंदवणे किंवा त्यांच्या उपस्थितीत नोंदवणे आवश्यक होते. या प्रकरणात तसे झाले नाही. याच हलगर्जीपणाबद्दल उपनिरीक्षक पवार यांना शनिवारपासून निलंबित केले.
याप्रकरणी सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या आदेशाने श्रीनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी चौकशी केली होती. त्यानंतर, उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी पडताळणी केली. प्राथमिक चौकशीत कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या उपनिरीक्षक पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
-सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट, ठाणे