विनयभंग करणाऱ्या गुन्हेगारास सक्तमजुरी
By Admin | Published: April 26, 2017 11:55 PM2017-04-26T23:55:48+5:302017-04-26T23:55:48+5:30
महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या विजय गंगाधर सोनावणे याला ठाणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा एल. गुप्ता
ठाणे : महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या विजय गंगाधर सोनावणे याला ठाणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा एल. गुप्ता यांनी बुधवारी दोषी ठरवून वेगवेगळ्या गुन्ह्यांत ४ वर्षे ६ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
अंबिकानगर येथे राहणारा विजय याने तेथेच राहणाऱ्या महिलेच्या घरात २४ फेब्रुवारी २०१५ रोजी घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच त्याच्याविरोधात मारहाण, विनयभंग असे एकूण १६ गुन्हे वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल आहेत. २ मार्च २०१५ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. यावर, प्रकरण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणी झाल्यावर सरकारी वकील शिल्पा महातेकर यांनी सबळ पुरावे आणि भक्कम साक्षीपुरावेही सादर केले. ते ग्राह्यमानून सोनावणे याला दोषी ठरवून विविध तिन्ही गुन्ह्यांत वेगवेगळी शिक्षा सुनावली. अशा प्रकारे त्याला ४ वर्षे ६ महिने अशी सक्तमजुरी व रोख १ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. (प्रतिनिधी)