नगरसेवक कार्यालयासमोर विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:19 AM2018-05-19T04:19:46+5:302018-05-19T04:26:14+5:30
शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांच्या कार्यालयात दोन महिलांमध्ये वाद झाल्यानंतर सिद्धू अभंगेसह चौघांनी रेणुका जाधव हिला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी घडला.
ठाणे : शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांच्या कार्यालयात दोन महिलांमध्ये वाद झाल्यानंतर सिद्धू अभंगेसह चौघांनी रेणुका जाधव हिला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका १४ वर्षांच्या मुलाने कबुतराला हात लावला, त्यावरून ही महिला आणि अन्य एका महिलेमध्ये १७ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास वाद झाला. हा वाद रेपाळे यांच्यापर्यंत गेला. त्यांच्याच कार्यालयात अभंगेसह चौघांनी तिला अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर, विनयभंग करून गोळ्या झाडून मारण्याची आणि बलात्काराचीही धमकी दिल्याचे या महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या धमकीनंतरच रेपाळे यांची पत्नी नगरसेविका नम्रता जाधव यांनी अभंगे आणि अयज पासी यांना कार्यालयाच्या बाहेर काढले. त्यानंतर, ही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असतानाच अभंगे याने आपल्या मुलीचेही कपडे फाडून तिचाही विनयभंग केला. त्यावेळी तलवारीने घराच्या दरवाजाचे पत्रे कापले, असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
हा प्रकार माझ्या कार्यालयात नव्हे, तर बाहेर घडला आहे. एका मुलाने कबुतराला हात लावण्यावरून दोन महिलांमध्ये वाद घडला. तिथे सिद्धू अभंगे नव्हता. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
- विकास रेपाळे, नगरसेवक, ठाणे