ठाण्यात खासगी व्यवस्थापनातील कर्मचारी महिलांचा व्यवस्थापकाकडून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 09:20 PM2018-08-15T21:20:33+5:302018-08-15T21:28:26+5:30
खासगी व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने महिलांचे रखडलेले पगार देण्यासाठी त्याच्या कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात १४ आॅगस्ट रोजी दाखल झाली आहे.
ठाणे : वागळे इस्टेट येथील एका मॉलमधील खासगी वित्त संस्थेतील तीन महिला कर्मचा-यांचा विनयभंग करणा-या अमित कदम या व्यवस्थापकाविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीनहातनाका येथील इटर्निटी मॉलमध्ये खासगी कर्जपुरवठा करणारी एक संस्था आहे. या संस्थेत व्यवस्थापकासह तीन पुरुष आणि सहा महिला कर्मचारी नोकरीला आहेत. यातील महिला कर्मचा-यांचे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतन थकवण्यात आले आहे. कदमने ८ आॅगस्ट रोजी रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान आपल्या केबिनमध्ये या ३४ वर्षीय कर्मचारी महिलेला सॅलरीबाबत बोलण्यासाठी एकटीला बोलवले. त्याचवेळी त्याने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा तिने आरोप केला आहे. तिच्यासह अन्यही दोन सहकारी महिलांनी अशाच प्रकारे त्याच्यावर आरोप केला आहे. तुमचे वेतन देतो, आपलाही मोबदला द्यावा लागेल, कुठे वाच्यता केल्यास बघून घेईल, अशी धमकी त्याने दिली. याप्रकरणी १४ आॅगस्ट रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. उपनिरीक्षक आर.एम. गोळे हे अधिक तपास करत आहेत.