विनयभंग करणाऱ्या भोंदूबाबाला अटक, पैसे उकळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:37 AM2019-07-17T00:37:54+5:302019-07-17T00:37:59+5:30
महिलांचा विनयभंग करणारा भोंदूबाबा चंद्रेश नरसी पीर (४९, रा. डोंबिवली) याच्यासह भारती शेवाळे (कल्याण) या दोघांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे
कल्याण : तुझ्या नव-याचे बाहेर संबंध असून तुझ्या घरच्यांचा तुला त्रास असल्याचे सांगत महिलांचा विनयभंग करणारा भोंदूबाबा चंद्रेश नरसी पीर (४९, रा. डोंबिवली) याच्यासह भारती शेवाळे (कल्याण) या दोघांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात विनयभंग, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट-अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
मोहने येथे राहणारी एक विवाहित महिला आपल्या चुलत बहिणीसोबत पतपेढीच्या कामानिमित्त पश्चिमेतील कोळवली परिसरात राहणाºया भारतीच्या घरी गेली होती. यावेळी, याठिकाणी असलेल्या भोंदूबाबा चंद्रेशने ‘तुझ्यावर चुडेल आहे, ती मी काढून देतो, तुझ्या नवºयाचे बाहेर संबंध आहेत, तुझ्या घरच्या लोकांचा तुला त्रास आहे’ असे सांगत सिगारेटचा धूर या विवाहितेच्या चेहºयावर सोडला. त्यानंतर सुगंधी द्रव्य लावण्याच्या बहाण्याने शरीरावर हात फिरवत विवाहितेकडे पूजेसाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्र-तंत्राने नुकसान करण्याची धमकी दिली. या प्रकाराबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात विवाहितेने अर्ज केला होता. पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे यांनी आपल्या पथकासह कोळवली परिसरात छापा टाकला. त्याठिकाणी पूजेचे साहित्य, टाचण्या, दिवे आदी साहित्य आढळून आले. तसेच काही जण आपल्या कौटुंबिक समस्या घेऊन या बाबाकडे आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी भोंदुबाबा चंद्रेश आणि भारती या दोघांना अटक केली आहे.