गृहप्रवेशासाठी ५०० ग्राहकांनी साधला पाडव्याचा मुहूर्त; ठाण्यात ८०० कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 12:11 PM2022-04-04T12:11:54+5:302022-04-04T12:12:01+5:30
ठाणे : तब्बल दोन वर्षांनी ठाण्यातील बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अपेक्षेपेक्षा ...
ठाणे : तब्बल दोन वर्षांनी ठाण्यातील बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे पाचशेहून अधिक ग्राहकांनी आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला, तर सुमारे एक हजार ते १२०० ग्राहकांनी नवीन घरासाठी बुकिंग केल्याची माहिती एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुंबईच्या वेशीवरील ठाण्याला चाकरमान्यांची पहिली पसंती असते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये रिअल इस्टेट अर्थात बांधकाम व्यवसायात मोठी मंदी आली होती. अनेक परप्रांतीय मजूर मूळ गावी जाणे, बांधकाम साहित्य न मिळणे, शिवाय किमती कमी होऊनही ग्राहकांनी पाठ फिरविणे अशा अनेक कारणांनी गेल्या दोन वर्षांमध्ये या व्यवसायाला उतरती कळा लागली होती. जसे निर्बंध हटविले, तसे पुन्हा या व्यवसायाने भरारी घेण्यास सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांपासून बुकिंग केलेल्या ग्राहकांनी आपली गृहकर्जे मंजूर करून घेत पाडव्याच्या दिवसाचा गृहप्रवेशचा मुहूर्त साधला. शहरातील घोडबंदर रोड, मानपाडा, नौपाडा, कळवा, पोखरण रोड आणि वर्तकनगर, आदी परिसरांमध्ये गगनचुंबी इमारतींची तथा टॉवर्सची बांधकामे वेगाने सुरू आहेत.
कोरोनामुळे बांधकाम व्यवसायावरही परिणाम झाला हाेता. त्यामुळेच ग्राहकांनी पुन्हा गृहखरेदीकडे आकर्षित होण्यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी घरांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट केली. काहींनी तर स्टॅम्प ड्युटी फ्री, घरात मोफत फर्निचरच्या ऑफर दिल्या. त्यामुळे ४५ लाख ते ७५ लाखांमध्ये वन बीएचके आणि ८५ लाख ते एक काेटी १० लाखांमध्ये टू बीएचके देणाऱ्या बिल्डर्सकडे गुढीपाडव्यानिमित्त बुकिंगसाठीही ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
एमसीएचआयचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक जितेंद्र मेहता यांच्या बांधकाम कंपनीतही शनिवारी १२ सदनिकांचे बुकिंग झाले, तर संपूर्ण ठाणे शहरात एक हजार ते १२०० सदनिकांचे बुकिंग झाल्याचेही ते म्हणाले. ही उलाढाल ८०० ते एक हजार कोटींच्या घरात असल्याचेही त्यांनी सांगितले. १ एप्रिलपासून रेडिरेकनरच्या दरामध्ये ठाणे शहरात साधारण २० टक्के वाढ झाली आहे. एक टक्के मेट्रोसेसही घेण्यात येणार आहे. त्यातच बांधकाम खर्चात २० टक्क्यांनी वाढ झाली. जीएसटीचे इनपुटही शासनाकडून मिळत नाही. अजून मेट्रो सुरू झालेली नसल्यामुळे मेट्रो सेस आकारण्यात येऊ नये, अशी अपेक्षाही बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
यंदा पाडव्याच्या निमित्ताने ठाणे शहरात सुमारे ५०० ग्राहकांनी मुहूर्तावर गृहप्रवेश केला, तर सुमारे १२०० ग्राहकांनी याच दिवशी घरांचे बुकिंगही केले. राज्य शासनाने मेट्रो सेस सहा महिन्यांनी लागू करावा. तरच ग्राहकांना आणखी फायदा होऊ शकतो.- जितेंद्र मेहता, अध्यक्ष, एमसीएचआय, ठाणे