केडीएमसी हद्दीतील जलकुंभांच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:50+5:302021-06-16T04:52:50+5:30

कल्याण : डोंबिवली पूर्वेतील रामचंद्र टॉकीजनजीकच्या जुन्या जलकुंभाच्या जिन्याचा धोकादायक भाग शनिवारी रात्री कोसळला. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली ...

Moment of repair of water tanks in KDMC limits | केडीएमसी हद्दीतील जलकुंभांच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त

केडीएमसी हद्दीतील जलकुंभांच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त

googlenewsNext

कल्याण : डोंबिवली पूर्वेतील रामचंद्र टॉकीजनजीकच्या जुन्या जलकुंभाच्या जिन्याचा धोकादायक भाग शनिवारी रात्री कोसळला. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ४० ते ४५ वर्षे उभ्या असलेल्या जलकुंभाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आता ‘व्हिजेटीआय’च्या अहवालाची अंमलबजावणी केडीएमसीतर्फे होणार आहे. कोविडमुळे लांबलेली जलकुंभांची दुरुस्ती आता टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत ७८ जलकुंभ आहेत. यातील काही जलकुंभ ४० वर्षांहून अधिक जुने आहेत. त्यामुळे त्यांचा काही भाग धोकादायक जीर्ण अवस्थेत असून, काही ठिकाणी गळती लागल्याने पाण्याची नासाडीही होत आहे. धोकादायक अवस्थेतील २० जलकुंभांचे वर्षभरापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट व्हिजेटीआय संस्थेकडून करण्यात आले होते. १८ जून २०२० ला त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालात जलकुंभांची दुरुस्ती करून वापरण्यालायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, त्यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा अहवाल कागदोपत्रीच राहिला.

जलकुंभांच्या दुरुस्तीला मुहूर्तच मिळाला नाही. त्यात दुरुस्तीचा खर्चही मोठा असल्याने या कामासाठी भरीव तरतूद मनपाच्या अर्थसंकल्पात करणे गरजेचे होते. त्याप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पात ती करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने प्रारंभीच्या काळात १० जलकुंभांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुरुस्तीच्या कामासाठी निविदा काढणे, ती मान्य करणे या प्रक्रियाही अद्याप बाकी आहेत. डोंबिवलीत शनिवारी जलकुंभाचा धोकादायक भाग कोसळल्याची घटना पाहता या प्रक्रियेला वेग पकडला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ज्या जलकुंभाचा भाग कोसळला त्याचा वापर सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे. घटना घडल्यावर पाणीपुरवठा विभागाला आता जलकुंभांच्या दुरुस्तीची आठवण झाल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

सूचनांची अंमलबजावणी

काही जलकुंभांचे व्हीजेटीआयकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. या अहवालात दुरुस्तीबाबत तसेच काही अन्य सूचना करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाणार आहे.

- राजीव पाठक, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग केडीएमसी

-----------------

Web Title: Moment of repair of water tanks in KDMC limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.