वनपट्टे नावावर करण्यासाठी भू-मापक मागतात पैसे?
By admin | Published: February 1, 2016 01:11 AM2016-02-01T01:11:52+5:302016-02-01T01:11:52+5:30
वनहक्काचे दावे मंजूर झाले तरी त्या जमिनीची मोजणी करण्यासाठी व ते नावावर करण्यासाठी नेमलेले भू-कर मापक आदिवासींकडे पैशाची मागणी करीत
मनोर : वनहक्काचे दावे मंजूर झाले तरी त्या जमिनीची मोजणी करण्यासाठी व ते नावावर करण्यासाठी नेमलेले भू-कर मापक आदिवासींकडे पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार आदिवासींनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मौजे वेळ गाव येथील वनहक्काचे दावे वन हक्क समितीने मंजूर केले. स. नं./ ग न १३ व ३० दावा क्र. ३२४६ ते ३२९७ ची मोजणी करण्याकामी भू-कर मापक (सर्व्हे कर्मचारी) एस. ए. आंधळे यांची नेमणूक केलेली आहे. ही मोजणी मोफत असून सुद्धा आंधळे यांनी प्लॉटधारकांकडून प्रत्येकी १५०० रू. जमीनीचे मोजमाप करण्यासाठी मागीतले आहेत. ते दिले नाहीत तर प्लॉट नावावर करून देणार नाही अशी धमकी त्या आदिवासींना दिली होती. घाबरलेल्या या आदिवासींनी आंधळे यांना दि. १३ते १७ जानेवारी दरम्यान एकूण २५ हजार रुपये जमा करून दिले आहेत अजूनही ते उर्वरित ५३००० रुपये मिळेपर्यंत प्लॉट नावावर करणार नाही, मोजणी नकाशे देणार नाही असे धमकावत आहेत.
प्रांताधिकारी, तहसिलदार पालघर यांच्याकडे रामा माणक्या पऱ्हाड, वसंत नवशा करमोडा, नश्या तांडेल, किसन सुतार अशा एकूण ५० ते ५३ प्लॉट धारकांनी तक्रार केली आहे. तसेच वनसमिती अध्यक्ष वर्षा कैलाश निस्कटे सचिव दिलीप फरले यांनीही तक्रार केली आहे. (वार्ताहर)