पैसा झाला खोटा, नाणी स्वीकारणे, बाळगणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:07+5:302021-09-23T04:46:07+5:30
अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: रुपया, दोन रुपयांचे नाणे चलनात असले तरी ते अनेकांकडून स्वीकारले जात नाही. त्यामुळे ...
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: रुपया, दोन रुपयांचे नाणे चलनात असले तरी ते अनेकांकडून स्वीकारले जात नाही. त्यामुळे अनेकांची अडचण होत आहे. मध्यंतरी १० रुपयांची खोटी नाणी मार्केटमध्ये आली आहेत, अशीदेखील चर्चा होती, परंतु, कालांतराने ही नाणी योग्य असल्याचे जाहीर केल्यावर त्यांचा स्वीकार होऊ लागला.
बहुतांशी वस्तुंच्या किमती या ५ किंवा १० रुपयांच्या पटीत आहेत, त्यामुळे एक, दोन रुपये पन्नास पैसे ही नाणी आता फारशी चलनात दिसून येत नाहीत.
----------------------
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
नाणी कुठलीच बंद केलेली नाहीत. मात्र, ५० पैशांत काहीच मिळत नसून साधे चॉकलेटदेखील सामान्यतः एक रुपयांपासून पुढे आहे, त्यामुळे ते नाणे चलनातून आपोआपच हद्दपार होत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांशी सर्व वस्तू या एक, दोन रुपयांपेक्षा पुढच्या मिळतात, त्यातही रिक्षा, रेल्वे, बसभाडेदेखील ५, १० रुपये आहे, त्यामुळे त्या ठिकाणीदेखील छोटी नाणी चालत नाहीत.
---------------
कोणती नाणी नाकारली जातात
साधारणपणे ५० पैसे, १, २ रुपये ही नाणी नाकारली जातात.
--/-------------/
बँका, मंदिर, रिक्षाचालक, बसवाहक, किराणा, मेडिकल, हॉटेल व्यावसायिक आदींकडे नाण्यांचा मोठा साठा असल्याचे दिसून येते.
---------------
पैसा असून अडचण
सहसा कोणतीच वस्तू ही एक-दोन रुपयांना येत नाही. साध्या पेनाची रिफिलदेखील पाच रुपयांना मिळते. देवांच्या दरबारी मंदिरातदेखील अभिषेक पाच रुपयांच्या पटीत होतात. त्यामुळे छोटी नाणी कोणी घेत नसल्याने ती असून अडचण होत आहे. साधे दान देतानादेखील कोणी छोटी नाणी घेत नाहीत. : संतकुमार भिडे, अर्थ विषयाचे अभ्यासक
------------
बँकांचे कामकाज वाढले आहे, त्यात कमी वेळात ग्राहकांना संतुष्ट करावे लागते. त्यामुळे कोणी सुटी नाणी भरायला आणल्यास ते वेळखाऊ असते, त्यामुळे असे ग्राहक आल्यास त्याना थोडे थांबवून नंतर फावल्या वेळेत बोलवावे लागते. नाणी असलेले ग्राहक नाकारले जात नसले तरी त्यांना प्राधान्य मात्र दिले जात नाही, हे वास्तव आहे. : संदीप देशपांडे, खासगी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले मॅनेजर