नाल्यातून काढल्या जाणाऱ्या गाळानुसार कंत्राटदाराला पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:41 AM2021-05-13T04:41:08+5:302021-05-13T04:41:08+5:30
कल्याण : कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे जास्त लक्ष असले तरी पावसाळ्य़ापूर्वी करण्यात येणारी कामे मार्गी लावण्यासाठीही महापालिकेने कंबर ...
कल्याण : कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे जास्त लक्ष असले तरी पावसाळ्य़ापूर्वी करण्यात येणारी कामे मार्गी लावण्यासाठीही महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाची पाहणी बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. यावेळी कंत्राटदाराने यंत्रांचा किती तास वापर केला, याऐवजी नाल्यातून किती गाळ काढला या निकषाच्या आधारे मोबदला देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
शहर अभियंता सपना देवनपल्ली कोळी यांच्यासह अभियंता अमित मादगुंडी, धांडे आदी यावेळी उपस्थित होते. आयुक्तांनी शहाड येथील नाल्याच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी जरीमरी येथील मोठ्या नाल्याची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, महापालिका हद्दीत ४२ मोठे नाले आहेत. त्यांची लांबी जवळपास ९४ किलोमीटर आहे. त्याचबरोबर ७४५ किलोमीटर अंतराचे लहान नाले आहे. पावसाळ्य़ापूर्वी नालसफाईच्या कामाचे कंत्राट विविध कंत्राटदारांना विभागून देण्यात आले आहे. त्यांच्याकडून नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झालेले आहे. येत्या ३१ मेपर्यंत हे काम १०० टक्के पूर्ण होणार आहे. यावेळी नालसफाईच्या कामाचा मोबदला कंत्राटदाराला देण्याची पद्धत बदलली आहे. यापूर्वी नालसफाईसाठी लावण्यात येणारी जेसीबी, पोकलेन मशीन किती तास गाळ काढण्याचे काम करते त्याआधारे बिल दिले जात होते. आता कंत्राटदार नाल्यातून किती गाळ काढतो, त्या परिमाणानुसार त्याचे बिल दिले जाईल. या पद्धतीमुळे नाल्यातील सगळा गाळ काढला जाऊन नाल्याचा प्रवाह पावसाळ्य़ात सुरळीत आणि नैसर्गिकरीत्या राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर नाले पावसाळ्य़ात तुंबणार नाहीत. परिणामी सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घटणार नाहीत.
काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी मान्सूनपूर्व कामांसाठी आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत सखल भागात पाणी साचणार नाही. तसेच रिंग रोड परिसरात पाणी साचून होऊन रस्त्यालगतच्या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश प्रभाग अधिकारी आणि एमएमआरडीएच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले होते.