पैसे घेतल्याच्या ‘त्या’ व्हिडिओची दखल: मुंब्य्रातील वाहतूक निरीक्षकासह ३९ अंमलदारांची तडकाफडकी बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 08:05 PM2024-02-18T20:05:24+5:302024-02-18T20:05:35+5:30
पोलिस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश: सहाय्यक आयुक्तांकडून होणार चौकशी.
ठाणे: एका वाहतूक मदतनीसाने पैसे घेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियाद्वारे व्हायरल झाल्याची गंभीर दखल वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी घेतली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश राठोड यांनी दिले. ही चौकशी चालू असेपर्यंत मुंब्रा वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश खेडेकर यांच्यासह ३९ पोलिस अंमलदारांची मुख्यालयात तडकाफडकी बदलीचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण ठाणे पोलिस आयुक्तालयात वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मुंब्रा वाहतूक उपविभागाच्या मदतनिसाकडून (ट्रॅफिक वॉर्डन) शिळफाटा याठिकाणी माेठया वाहन चालकांकडून अवैधरित्या पैशांची वसूली केली जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची गांभीर्याने दखल घेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या आदेशाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक खेडेकर यांच्यासह जमादार अखलाक पिरजादे, सुनिल गणपते, शांताराम बोरसे, अरमान तडवी, हवालदार माणिक पाटील, महेश भोसले आणि विजय बोरसे अशा ३९ अंमलदारांवर तडकाफडकी मुख्यालयात बदलीची कारवाई केली. या कारवाईने संपूर्ण मुंब्रा वाहतूक उपविभागच रिक्त झाला असून याठिकाणी इतर उपविभागातील कर्मचाऱ्यांना वर्ग केले जाणार आहे. तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक खेडेकर यांच्या जागी आता उपायुक्त कार्यालयातील निरीक्षक समाधान चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. वाहतूक शाखेमध्ये एकाच वेळी संपूर्ण उपविभागावर कारवाई होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याचे बाेलले जात आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर कारवाई-
एका व्हायरल व्हिडिओमध्ये या पोलिसांकडून शिळफाटा याठिकाणी अवजड वाहनांकडून अवैधरित्या पैशांची कथितपणे वसुली केली जात होती. हेच कारण देत या सर्वांची मुख्यालयात १७ फेब्रुवारी २०२४ रोजी चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्पूरती बदली केली आहे. अशी वसूली खराेखर केली जात हाेती का? यामध्ये या उपविभागातील किती जणांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे, याचीही चाैकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘एका वाहतूक वार्डनकडून पैसे घेतल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला हाेता. यामध्ये सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्फतीने चौकशी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या अधिकारी कर्मचारी यांची तात्पूरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली केली आहे.’
डॉ. विनय राठोड, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे