उल्हासनगरात पठाणी व्याजखोरांचे धाबे दणाणले; व्यापारी महामंडळ पोलिसांकडे करणार पाठपुरावा
By सदानंद नाईक | Published: September 9, 2023 07:24 PM2023-09-09T19:24:04+5:302023-09-09T19:24:54+5:30
उल्हासनगरात पठाणी व्याजखोरांचा बोलबाला व दहशत असून दामदुप्पट दराने रक्कम व्याजाने दिली जाते. काही महिन्यांपूर्वी पठाणी व्याजाला कंटाळून गिरीश चुग नावाच्या इसमाने लोकल ट्रेन खाली आत्महत्या केली होती.
उल्हासनगर : व्यापारी महामंडळाने २८ व्याजखोरांची रेकॉर्डिंग व इतर कुंडली हिललाईन पोलिसांना दिल्याने, त्यांचे धाबे दणाणले आहे. एकून २११ नागरिकांच्या तक्रारीनंतर महामंडळ अॅक्शन मोडमध्ये आले असून याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी अनिल जगताप यांनी दिली आहे.
उल्हासनगरात पठाणी व्याजखोरांचा बोलबाला व दहशत असून दामदुप्पट दराने रक्कम व्याजाने दिली जाते. काही महिन्यांपूर्वी पठाणी व्याजाला कंटाळून गिरीश चुग नावाच्या इसमाने लोकल ट्रेन खाली आत्महत्या केली होती. आत्महत्यापूर्वी चुग यांनी पठाणी व्याजखोरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच गेल्या महिन्यात एका पठाणी व्याजखोरावर गुन्हा दाखल झाला. दरम्यान कॅम्प नं-१ मध्ये एका महिलेला पठाणी व्याजखोरांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र पोलिसांकडून ठोस कारवाई झाली नसल्याने, पठाणी व्याजखोरांचा आतांक शहरात सुरू आहे. याविरोधात कॅम्प नं-५ येथील व्यापारी महामंडळाने दंड थोपटल्याने, पठाणी व्याजखोरां विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
शहरातील कॅम्प नं-५ येथील व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष गोपी वाधवानी व उपाध्यक्ष नरेश रोहिडा यांनी पुढाकार घेतल्याने, २११ पीडित नागरिकांनी महामंडळाकडे धाव घेतली. त्यांच्याकडील मोबाईल रेकॉर्डिंग मध्ये २८ पठाणी व्याजखोरांचे बिंग उघडे झाले असून पावणे तीन कोटीचा व्यवहार झाल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. व्यापारी महामंडळाच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी बैठक घेऊन व्याजखोरां विरोधात भूमिका घेतली. हिललाईन पोलीस ठाण्यात २८ पठाणी व्याजखोरांची रीतसर तक्रार दिल्याची माहिती रोहिडा यांनी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात तोंडी तक्रारी व्यतिरिक्त लेखी तक्रार करण्यास कोणी धजावत नसल्याने, गुन्हा दाखल झाला नाही. अशी माहिती तपास अधिकारी अनिल जगताप यांनी दिली. तपासात गुन्हा निष्पन्न झाल्यास कारवाईचे संकेत जगताप यांनी दिले.
पठाणी व्याजखोर राजकीय पक्षाचे संबंधित?
व्यापारी महामंडळाने ज्या २८ पठाणी व्याजखोरांचे मोबाईल रेकॉर्डिंग व नावे पोलिसांना लेखी दिली. ते विविध राजकीय पक्षाचे संबंधित आहेत. अशांना राजकीय वरदहस्त लाभल्याने, पोलीस ठोस कारवाई करीत नसल्याचे रोहिडा यांचे म्हणणे आहे.