वाडा तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:07 PM2019-08-08T23:07:07+5:302019-08-08T23:07:15+5:30
बाधितांचे स्थलांतर करण्याचे आश्वासन; पाली आश्रमशाळा तत्काळ सुरू करण्याचे आदेश
वाडा : रविवारी (४ आॅगस्ट) वाडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहा:कार उडून जवळपास ६० गावांना याचा फटका बसला आहे. यात बोरांडा गाव आणि पाली येथील शासकीय आश्रमशाळा येथे जास्त नुकसान झालेल्या भागांना खा. राजेंद्र गावित यांनी गुरुवारी भेट दिली. या बाधित भागांची पहाणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
अतिवृष्टीमुळे बोरांडा गावातील जवळपास १०४ कुटुंबे बाधित झाली आहेत. या प्रत्येक बाधित कुटुंबाना तात्काळ मदत म्हणून ५ हजार रुपयांची भांडी, कपड्यांसाठीची मदत आणि १० किलो तांदूळ, १०किलो गहू तसेच ५ ली. रॉकेल अशी प्राथमिक स्वरुपाची मदत प्रशासनाच्यावतीने खा. गावितांच्या हस्ते देण्यात आली. अतिवृष्टीच्यावेळी आपल्या जीवाची बाजी लावून तराप्याच्या साहाय्याने १७ नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचिवणारे पप्या पवार व कल्पेश गवते या तरु णांना खासदार गावितांनी प्रत्येकी ११ हजार रु पये बक्षीस म्हणून देवून त्यांचा गौरव केला.
बोरांडा गावातील पूर परिस्थितीची पहाणी केल्यानंतर या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सर्व आदिवासी बाधित कुटुंबांशी चर्चा करून अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात येऊन या निर्णयाला येथील आदिवासींनी दुजोरा दिल्याने स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश गावितांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर खासदारांनी पाली आश्रम शाळेची पाहणी केली. येथे कायम पाण्याची पातळी वाढून आश्रमशाळेत सुमारे सात ते आठ फुट उंचीपर्यंत पाणी वाढते. येथील विद्यार्थ्यांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात येते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या आश्रमशाळेसाठी बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीमध्ये या विद्यार्थ्यांना तत्काळ तिथे स्थलांतरीत करून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. या संदर्भात आश्रमशाळा प्रशासनाबरोबर संपर्क साधून पुढील कार्यवाही संदर्भात खासदार गावितांनी आदेश दिले.
या दौºयादरम्यान उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, नायब तहसीलदार मिताली परदेशी, सहाय्यक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, शिवसेनेचे जिल्हा सहसमन्वयक गोविंद पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पाटील, वाड्याच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, पंचायत समिती सदस्य नरेश काळे, उपतालुका प्रमुख तुषार यादव, शहर प्रमुख नरेश चौधरी यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.