कोरोनाच्या संशयीतांवर पालिका ठेवणार जीपीएसद्वारे नजर, केव्हीगार्ड अॅप होम कॉरन्टाईनंच्या मोबाइलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 01:54 PM2020-03-30T13:54:14+5:302020-03-30T13:55:45+5:30
होम क्वॉरन्टाइन करण्यात आलेल्या नागरीकांवर आता ठाणे महापालिका जीपीएसद्वारे नजर ठेवणार आहे. त्यानुसार आता जीओ टॅगींगचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे. परंतु जर एखाद्या नागरीकाने आपला मोबाइलच घरी ठेवला तर त्याचे परिणामही इतरांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार आता केव्हीगार्ड अॅपच्या सहाय्याने होम कॉरन्टाइनवर केलेल्यांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यानुसार रविवार पासून या सर्वांचे जीओ टॅगींगटचे काम सुरु झाले असून ते सोमवारी पूर्ण झाले आहे. त्यानुसार आता ज्यांना होम कॉरन्टाइन करण्यात आलेले आहे. त्यांच्यावर या जीपीएसद्वारे नजर ठेवली जाणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्याला आळा बसावा यासाठी गर्दी करु नका असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील बाजारपेठांमध्ये गर्दी केली जात आहे. दुसरीकडे, जे परदेशातून आलेले नागरीक आहेत, किंवा त्यांच्या संपर्कात आलेले नागरीक असतील अशांना होम कॉरन्टाइन केले जात आहे. परंतु असे नागरीक देखील बाहेर पडतांना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना बाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे या होम कॉरन्टाइन संशयीतांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून जीपीएसद्वारे नजर ठेवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने देखील त्यादृष्टीने खबरदारी घेण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने पालिकेने देखील आतापर्यंत होम कॉरन्टाइन करण्यात आलेल्या १८६१ नागरीकांना तसेच नव्याने येणाऱ्या नागरीकांवर देखील अशा पध्दतीने देखरेख ठेवली जाणार आहे. या नागरीकांच्या मोबाइलमध्ये केव्हीगार्ड हे अॅप महापालिकेच्या माध्यातून डाऊनलोड केले जाणार आहे. त्यानंतर या अॅपच्या माध्यमातून आणि जीपीएसद्वारे या नागरीकांना नजर ठेवली जाणार आहे. संबधींत नागरीक ठराविक ठिकाणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर महापालिकेच्या संबधींत केंद्रात याची तत्काळ माहिती उपलब्ध होणार आहे. त्यानुसार संबधींत नागरीका पुन्हा होम कॉरन्टाइन केले जाणार आहे. त्यानुसार सध्या मागील दोन दिवसापासून जीओ टॅगींगचे काम सुरु झाले असून ते आता संपणार आहे. त्यानंतर आता हे काम सुरु होणार आहे.
- केव्हीगार्ड अॅपद्वारे नजर ठेवतांनाच आता या नागरीकांशी रोज संबधींत विभागाचे डॉक्टर, पालिकेचे इतर पदाधिकारी व्हीडीओ कॉल करुन या नागरीकांच्या संपर्कात राहणार आहेत. त्यांना काय हवे काय नको, त्यांची प्रकृती कशी आहे, याचीही विचारपुस केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
जीपीएसचा असाही धोका
महापालिकेच्या माध्यमातून मोबाइलमध्ये अॅप टाकून जीपीएसद्वारे नजर ठेवण्याचा जरी हा चांगला विचार पालिकेने आणला असला तरी यामध्ये आणखी एक धोकाही संभवतो आहे, तो म्हणजे जर तुमच्या जवळ मोबाइल असेल तरच तुमचे लोकशेन समजणार आहे. मात्र मोबाइल घरी ठेवून एखादा नागरीक बाहेर जाण्याची शक्यता यात नाकारता येत नाही. त्यामुळे नागरीकांना या प्रक्रियेला सहकार्य करावे अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे.