'मंकी पॉक्स'ची दहशत, ठाणे महापालिकेने आरोग्य विभागाला दिला सतर्कतेचा इशारा; काय आहे लक्षणं वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 09:06 PM2022-05-24T21:06:35+5:302022-05-24T21:07:20+5:30
ठाणे महापालिका प्रशासन मंकी पॉक्सबाबत गंभीर आहे. आतापर्यंत येथे एकाही रुग्णाची पुष्टी झालेली नाही.
ठाणे:
ठाणे महापालिका प्रशासन मंकी पॉक्सबाबत गंभीर आहे. आतापर्यंत येथे एकाही रुग्णाची पुष्टी झालेली नाही. हा स्थलांतरित संसर्गजन्य आजार आहे. तो कधीही झपाट्याने पसरू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेने आरोग्य विभागाला सतर्क केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
प्राण्यांपासून पसरणाऱ्या या संसर्गजन्य आजाराबाबत महापालिका आरोग्य विभाग निश्चितच सतर्क झाला आहे. पालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेवरून मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, महानगरपालिकेच्या ३० आरोग्य केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना जारी करून दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय कोणत्याही संशयित रुग्णांची तपासणी करून नमुने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील, अशा रुग्णांची यादी तयार करून त्यांची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.
मंकीपॉक्स हा प्राण्यांद्वारे पसरणारा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार आहे. तो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यमान भागात आढळतो आणि अधूनमधून संसर्गाची प्रकरणे इतर भागात दिसून येत असल्याची माहिती ठामपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी प्रसाद पाटील यांनी दिली.
अशी आहेत लक्षणे-
मंकीपॉक्समध्ये सामान्यत: ताप, पुरळ आणि सूज यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे अनेक वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकते. ही लक्षणे सहसा दोन ते चार आठवडे दिसतात आणि हळूहळू बरी होतात. काहीवेळा प्रकरणे गंभीर असू शकतात आणि या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण एक ते दहा टक्क्यांपर्यंत असते. हा आजार प्राण्यांपासून मनुष्यामध्ये आणि नंतर मनुष्यापासून इतर मनुष्यांमध्ये पसरू शकतो. विषाणू तुटलेली त्वचा (दिसत नसली तरीही), श्वसनमागार्तून किंवा श्लेष्मल पडद्याद्वारे (डोळे, नाक किंवा तोंड) शरीरात प्रवेश करतो. तसेच प्राण्यांपासून मानवापर्यंत चाव्याव्दारे किंवा ओरखडे, बुशमीट (वन्य प्राण्यांचे मांस), शरीरातील द्रवपदार्थ किंवा संक्रमित व्यक्तीचे कपडे, पलंग यांसारख्या जखमांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपकार्तून पसरू शकतात. हा आजार १ ते २१ दिवसांच्या दरम्यान पसरू शकतो
मानव-ते-मानव प्रसारण प्रामुख्याने मोठ्या श्वासोच्छवासाच्या कणांद्वारे होते असे मानले जाते, ज्यासाठी सहसा दीर्घकाळ जवळचा संपर्क आवश्यक असतो. मंकीपॉक्स रोगाचा विकास कालावधी साधारणत: ७ ते १४ दिवसांचा असतो, परंतु तो ५-२१ दिवसांचादेखील असू शकतो. या काळात व्यक्ती सहसा संसर्गजन्य नसतो. संक्रमित व्यक्ती पुरळ दिसण्यापूर्वी एक ते २१ दिवसांपर्यंत हा रोग पसरवू शकतो. जोपर्यंत सर्व पुरळ कमी होत नाही आणि बरे होत नाही तोपर्यंत संसर्गजन्य राहू शकतो, असेही डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.