...अन् त्या माकडीनीने नवजात बालकाला घेतले कुशीत; आईच्या नाळेने वाचला पिल्लाचा जीव 

By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 21, 2023 04:34 PM2023-08-21T16:34:01+5:302023-08-21T16:34:01+5:30

पहिल्यांदाच आई झालेल्या माकडीणीने तिच्या नवजात पिल्लाला तब्बल पाच ते सहा तासानंतर आपल्या कुशीत घेतले.

monkey took the new-born child in her arms Mother's placenta saved the puppy's life | ...अन् त्या माकडीनीने नवजात बालकाला घेतले कुशीत; आईच्या नाळेने वाचला पिल्लाचा जीव 

...अन् त्या माकडीनीने नवजात बालकाला घेतले कुशीत; आईच्या नाळेने वाचला पिल्लाचा जीव 

googlenewsNext

ठाणे : पहिल्यांदाच आई झालेल्या माकडीणीने तिच्या नवजात पिल्लाला तब्बल पाच ते सहा तासानंतर आपल्या कुशीत घेतले. सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका एसीवर जन्मलेले हे नवजात पिल्लू वरुन लटकत राहीले ते खाली पडणार की काय असे वाटत असताना त्या आई झालेल्या माकडीणीच्या नाळेने पिल्लाला वाचविले. ही घटना घडली उपवन परिसरात. पिल्लाचा जन्म झाल्यावर त्या माकडीने तिची आणि पिल्लाची नाळ तोडलेली नव्हती. त्यामुळे त्या नाळीने नवजात पिल्लाचा जीव वाचला असे वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनने सांगितले. 

गेले अनेक महिने या परिसरात वावरत असलेली एका माकडीणीने उपवन परिसरातील रौनक सोसायटी येथील तिसऱ्या मजल्यावरील एका एसीच्या टपावर पिल्लाला जन्म दिला. पहिल्यांदाच आई झालेल्या या माकडीणीला आपल्या पिल्लाला कसे सांभाळायचे, त्याला कुशीत कसे घ्यायचे हे माहीत नसल्याने ते पिल्लू तसेच पडून राहीले. तिची आणि तिच्या पिल्लाची नाळ तिने तोडली नाही. (प्राणी हे पिल्लाला जन्म दिल्यावर तोंडाने ती नाळ तोडतात असे प्राणीमित्र संघटनांनी सांगितले.) ते पिल्लू सरकत सरकत वरुन लटकत राहीले, ते नवजात पिल्लू पडेल की काय असे वाटत असताना त्या माकडीणीच्या नाळेने त्या पिल्लाचा जीव वाचत राहीला. ते रक्ताने भरले होते. काही तास असेच ते पिल्लू लटकत होते. 

परिसरातील काही प्राणीमित्रांची वर नजर जाताच त्यांनी वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य आणि मानद वन्यजीव रक्षक रोहीत मोहीते यांना तात्काळ कळविले, ते आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि वनविभागाच्या मदतीने त्या माकडणी आणि तिच्या पिल्लाला ताब्यात घेतले. नुकत्याच जन्म दिलेल्या त्या पिल्लाला ही माकडीण जवळ का घेत नाही, याची तपासणी करण्यासाठी रोहीत आणि त्यांच्या टीमने डॉ. दीपा कटीयाल यांच्याकडे नेले, त्यावेळी ती पहिल्यांदाच आई झाल्याने तिला पिल्लाला कसे जवळ घ्यावे हे ठाऊक नसावे, तसेच, तिच्या अंगात त्राण नव्हते असे डॉक्टरांनी सांगितले. डॉॅक्टरांनी ती नाळ कापली आणि पिल्लाला हातात घेऊन तिच्याकडे दिले तिने मायेने त्याला कुशीत घेतले आणि घेतल्यावर त्याला दूध पाजले. उपस्थित डॉक्टरांसह प्राणीमित्रही हे बघत होते, त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. ममतेचा पाझर या माकडणीला फुटला होता. जेव्हा कोणतेही वन्यजीव शहरात येतात तेव्हा त्यांचे प्राण माणूसकीच्या दृष्टीकोनातून वाचवा, त्यांना मदत करा कारण त्यांच्या जागेवर आपण आलो आहोत असे आवाहन रोहीतने केले.

Web Title: monkey took the new-born child in her arms Mother's placenta saved the puppy's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.