दीड महिन्यात रुग्णांना लागले ७७ हजार ५१२ रेमडेसिविर, तर २०३ टोसिलीझुमॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:49+5:302021-06-02T04:29:49+5:30
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोविड रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनसह टोसिलीझुमॅब इंजेक्शनचादेखील तुटवडा जाणवू लागला होता. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी ...
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोविड रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनसह टोसिलीझुमॅब इंजेक्शनचादेखील तुटवडा जाणवू लागला होता. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासह, रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नेमलेल्या संनियंत्रण समितीच्या माध्यमातून मागील दीड महिन्यात विविध खासगी कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी ७७ हजार ५१२ रेमडेसिविर, तर २०३ टोसिलीझुमॅब इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले.
मार्चअखेर व एप्रिल महिन्यात कोरोनाने थैमान घातले. या कालावधीत रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वाढली. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी कोविड रुग्णालयांमधील बेड्सदेखील अपुरे पडू लागले होते. त्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, कालांतराने ऑक्सिजनचादेखील तुटवडा निर्माण झाला होता. त्यापाठोपाठ कोविड रुग्णांसाठी अत्यवश्यक असलेले रेमडेसिविर आणि टोसिलीझुमॅब या इंजेक्शनचादेखील तुटवडा झाल्याने मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला होता. ही बाब लक्षात घेऊन या दोन्ही इंजेक्शनबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी एका संनियंत्रण समितीची स्थापना केली. या समितीमार्फत ज्या खासगी कोविड रुग्णालयांकडून ज्या रुग्णांना इंजेक्शनची आवश्यकता आहे, त्याची माहिती दिल्यानंतर त्यांना इंजेक्शन पुरविण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागील दीड महिन्यात ७७ हजार ५१२ रेमडेसिविर, तर २०३ टोसिलीझुमॅब इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांची इंजेक्शनसाठी फरफट थांबली असून, रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रोजच्या रोज प्राप्त पुरवठ्यानुसार रुग्णालयांना इंजेक्शन पुरविले जात असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.