ठामपा हद्दीतही महिनाभर सार्वजनिक शौचालय स्वच्छ मोहीम
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 1, 2023 05:24 PM2023-12-01T17:24:42+5:302023-12-01T17:25:42+5:30
ठाणे महानगरपालिकेतर्फे महिनाभर शहरातील नऊ प्रभाग समितीतील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून 25 डिसेंबरपर्यत देशव्यापी स्वच्छ शौचालय मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 आणि राज्य महाराष्ट्र मिशन अर्बन 2.0 यांच्या अंतर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे महिनाभर शहरातील नऊ प्रभाग समितीतील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे.
ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही मोहिम अखंड सुरू रहावी यासाठी महापालिकेने २३ ते २६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि घनकचरा विभाग यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालयाची तपासणी केली. त्यातून प्रत्येक प्रभाग समितीतील एक या प्रमाणे नऊ शौचालयांची निवड या मोहिमेसाठी केली आहे. सार्वजनिक शौचालये ही नागरिकांना वापरण्यायोग्य, सहज उपलब्ध होतील म्हणजेच घरापासून जवळ, स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही असतील या निकषांवर मोहिमेतील शौचालयांची निवड करण्यात आली आहे.
या मोहिमेतंर्गत ठामपाने निवड केलेल्या सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी 25 डिसेंबरपर्यत हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याचबरोबर, शहरातील सर्वच सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. तसेच नागरिकांनी देखील सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यानंतर शौचालय स्वच्छ ठेवणे देखील गरजेचे आहे.