महिनाभर दूषित पाणीपुरवठा, अंबरनाथमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:43 AM2019-11-15T00:43:56+5:302019-11-15T00:44:00+5:30
एकदोन दिवस नव्हे तर गेल्या महिनाभरापासून अंबरनाथमधील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर परिसरांत दूषित पाणीपुरवठा केला जात आहे.
अंबरनाथ : एकदोन दिवस नव्हे तर गेल्या महिनाभरापासून अंबरनाथमधील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर परिसरांत दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. याप्रकरणी तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर, स्थानिक महिलांना सोबत घेत काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना घेराव घातला. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. आठ दिवसांत समस्या न सुटल्यास महालक्ष्मीनगर चौकात उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
अंबरनाथच्या चिखलोली धरणातून ज्या भागांना पाणीपुरवठा केला जातो, त्यातील महालक्ष्मीनगर, शिवाजीनगर परिसरात नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. जे पाणी दैनंदिन कामासाठी वापरणेही शक्य नाही, ते पाणी स्वच्छ करून पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे या भागात जो पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी एक दिवस स्वच्छ आणि दुसºया दिवशी अस्वच्छ पाणी येते. दिवसाआड स्वच्छ पाणी येत असल्याचे समाधान अधिकारी व्यक्त करत आहेत, एक दिवसाआड अस्वच्छ पाणी येत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. दिवसाआड स्वच्छ पाणीपुरवठा करण्यामागचा जीवन प्राधिकरणाचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, ही समस्या अनेक दिवसांपासून असतानाही प्राधिकरण या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. अनेक ठिकाणी जलवाहिन्या तुटलेल्या आहेत, तर काही जलवाहिन्या या थेट नाल्यातच तुटल्याने ते दूषित पाणी येण्याचे प्रमाणही वाढत आहे. ही समस्या अनेक दिवसांपासून असतानाही त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पाणीपुरवठा करणारे जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करत आहे.
आपल्या समस्येकडे लक्ष दिले जात नसल्याने या भागातील महिलांनी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली. पाटील यांनी सर्व महिलांना एकत्रित करून प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय गाठले. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारीच नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. या ठिकाणी उपस्थित इतर अधिकाºयांना याप्रकरणी जाब विचारण्यात आला. मात्र, अधिकारी यासंदर्भात ठोस उत्तर देण्यात अपयशी ठरले. अधिकाºयांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पाटील यांनी प्राधिकरणाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. आठ दिवसांत या भागातील दूषित पाण्याची समस्या न सुटल्यास महालक्ष्मीनगर चौकातच उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाºयांनी या समस्येच्या सोडवणुकीसाठी काम हाती घेतले. मात्र, त्यावर अद्याप ठोस उपाय झालेला नाही. प्राधिकरणाच्या कारभारावर सातत्याने अंबरनाथ, बदलापूरमधील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
>समस्या वर्षभरापासून असली तरी महिनाभरात ती अधिक तीव्र झाली
दरम्यान, या भागातील महिलांनी प्राधिकरणाच्या अधिकाºयांना दूषित पाणी आणि मूळ समस्येची माहिती दिल्यावर अधिकारी केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. ही समस्या गेल्या वर्षभरापासून आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून ही समस्या वाढल्याचे महिलांनी स्पष्ट केले.