बीएसयूपीच्या २३८३ घरांचे महिनाअखेरीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:23 AM2019-08-03T00:23:35+5:302019-08-03T00:23:39+5:30
आयुक्तांनी घेतला आढावा : बाधितांसह दिव्यांगांना लाभ
ठाणे : महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बीएसयूपी प्रकल्पांतर्गत एकाचवेळी जवळपास २३८३ इतक्या सदनिकांचे वितरण या महिनाअखेर प्रकल्पबाधितांसह दिव्यांगांना वितरित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. या निर्णयामुळे प्रकल्पबाधितांसह दिव्यांगांना आपल्या हक्काची घरे मिळणार आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बीएसयूपी प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत तुळशीधाम येथे १६१ सदनिका, सागर्ली रिव्हर वूड्स, कल्याणफाटा येथे ९५, पडलेगाव ६५५, कासारवडवली ६३, ब्रह्मांड ३०, सिद्धार्थनगर, कोपरी (पू.) येथे २८०, खारटन रोड येथे १४४, महात्मा फुलेनगर, कळवा येथे १४३ आणि टेकडी बंगला येथे १८५ सदनिका महापालिकेस प्राप्त होणार आहेत.
पायाभूत सुविधांची कामे त्वरित पूर्ण करा
यातील १४४२ सदनिका शहरातील विविध प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या लोकांना प्राधान्याने वितरित करण्यात येणार आहेत. तसेच ७५२ सदनिका या अस्तित्वातील पात्र रहिवाशांना वितरित करण्यात येणार आहेत. १९० सदनिका या दिव्यांगांसाठी राखून ठेवण्यात आल्या असून त्याची सर्व प्रक्रि या करून त्या वितरित करण्याचे आदेश आयुक्तांनी या बैठकीत दिले.
त्याचप्रमाणे गावदेवी येथील बाधितांना तसेच कळवा खाडीपूल येथील बाधित मातंग समाजाच्या लोकांनाही बीएसयूपीमधील सदनिका वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व ठिकाणांची पाहणी करून रस्ते, वीज, पाणी, मलनि:सारण व्यवस्था आदी कामे सुरू असतील, तर ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांना दिल्या. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, मलनि:सारण विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.