लोकगायकाचे स्मारक अपूर्णावस्थेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:22+5:302021-06-23T04:26:22+5:30
कल्याण : केडीएमसी प्रशासनासह लोकप्रतिनिधींमधील अनास्थेमुळे लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. शिंदे यांचा बुधवारी १८ ...
कल्याण : केडीएमसी प्रशासनासह लोकप्रतिनिधींमधील अनास्थेमुळे लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. शिंदे यांचा बुधवारी १८ वा स्मृतिदिन आहे. परंतु स्मारकाच्या ठिकाणी प्रस्तावित असलेली कामे अद्यापही पूर्णत्वास आलेली नाहीत.
ऐका सत्यनारायणाची कथा, पाऊले चालती पंढरीची वाट, चल गं सखे पंढरीला, बाप्पा मोरया रे, उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली अशी शेकडो भक्तिगीते, भावगीते, कव्वाली आणि कोळीगीते गाऊन आपल्या गायकीचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या शिंदे यांची गाणी आजही रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. कल्याणचे रहिवासी असलेल्या या महाराष्ट्राच्या लोकगायकाची २३ जून २००३ रोजी प्राणज्योत मालवली. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा ठराव १६ जुलै २००४ रोजी मनपाच्या महासभेत करण्यात आला. मात्र तब्बल चार वर्षांनी या स्मारकाच्या भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला. शहरापासून ५ ते ६ कि.मी. अंतरावरील कोळवली येथे उभारलेल्या या स्मारकाचे काम आजही अपूर्णच आहे. २०१० च्या महापालिका निवडणुकीआधी या कामाचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने घाईघाईत अर्धवट स्थितीतील स्मारकाचे लोकार्पण करून एकप्रकारे या लोकगायकाच्या स्मारकाची थट्टा केली. स्मारकाच्या ठिकाणी शिंदे यांचा पुतळा उभारून बाजूकडील संरक्षक भिंतींना रंगरंगोटी करून घाईत लोकार्पण उरकण्यात आले. दरम्यान, प्रस्तावित कामांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असताना विरोधी पक्षही निद्रावस्थेत राहिला. स्मारकाच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा है’ असे चित्र आहे. या ठिकाणची शोभेची झाडे पाण्याअभावी सुकून गेली. त्याची जागा दारूच्या बाटल्या, सिगारेट-पानमसाल्याच्या पाकिटांनी घेतली आहे. हा स्मारक परिसर दारुड्यांचा आणि धुम्रपान करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्या पुतळ्याला घालण्यात आलेला हारदेखील पूर्णपणे सुकून गेला आहे.
............
निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा बाजार
निवडणुकांच्या तोंडावर स्मारक उभारणीच्या घोषणा तसेच लागलीच भूमिपूजनाचे घाट घातले जातात. हीच तत्परता हे स्मारकाचे काम पूर्ण होते की नाही, ते कोणत्या अवस्थेत आहे याबाबतही दाखवणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. रिपाइंचे नेते तथा मंत्री रामदास आठवले असो अथवा स्थानिक राजकीय पदाधिकारी यांनी वेळोवेळी स्मारकाला भेटी देऊन याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पण आजही परिस्थिती जैसे थेच आहे.
------------------------------------------------------
फोटो आहे