मुरबाडमध्ये साकारतेय वन हुतात्म्यांचे स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:28+5:302021-07-18T04:28:28+5:30
मुरबाड : नैसर्गिक वनसंपदेचे संरक्षण व जतन करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुरबाडमध्ये ...
मुरबाड : नैसर्गिक वनसंपदेचे संरक्षण व जतन करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुरबाडमध्ये ‘वन हुतात्मा स्मारक’ उभारण्यात येत आहे. वन विभागाच्या प्रांगणात या स्मारकाची उभारणी करण्यात येत असून, या स्मारकामुळे मुरबाड शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नागपूर येथे असे स्मारक उभारले गेले असून, याच धर्तीवर दुसरे स्मारक मुरबाड येथे होणार आहे.
मुरबाड तालुक्यातील वनविभागाने बागेश्वरी तलावाचे पर्यटन क्षेत्र तयार केले असून, शेजारी असलेल्या वनात विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली आहे. त्याठिकाणी असणारी शोभिवंत झाडे, तसेच इतर करमणुकीची उपलब्ध साधने यामुळे हे देखील पर्यटन क्षेत्र पर्यटकांना खुणावत आहे. वनांचे संरक्षण करताना हिस्रप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या वन अधिकारी व कर्मचारी यांना वन हुतात्म्यांचा दर्जा देऊन त्यांचे वन हुतात्मा स्मारक शासन उभारते. महाराष्ट्रातील नागपूर येथे असे स्मारक साकारले आहे. याच धर्तीवर दुसरे हुतात्मा स्मारक ठाण्यातील मुरबाड तालुक्यात उभारण्यासाठी वरिष्ठांच्या सहकार्याने सुमारे २५ लाखांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे आणि या स्मारकाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे, असे मुरबाड पूर्वचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भामरे यांनी सांगितले.
या स्मारकासाठी चेन्नई येथून विशिष्ट प्रकारचा दगड मागविण्यात आला असून, एकाच भव्य मोठ्या दगडावर मुरबाड तालुक्यातील तीन वन हुतात्म्यांची शिल्पे कोरली जात आहेत. वन अभियंता यांच्या देखरेखीखाली हे स्मारक उभारले जात आहे.