मोपलवार खंडणी प्रकरण : मांगले होता श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 06:14 AM2017-11-06T06:14:30+5:302017-11-06T06:14:33+5:30
सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्यानंतर लागलीच श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत सतीश मांगले होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे
ठाणे : सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्यानंतर लागलीच श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत सतीश मांगले होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. खंडणीवसुलीसाठी त्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्यानंतर शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी तो दुसºया पत्नीसोबत श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, गुरुवारी रात्रीच ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला जेरबंद केले.
मांगलेजवळ श्रीलंका आणि कोल्हापूर येथील नंबर असलेले मोबाइल होते. तो या दोन्ही नंबरवरून कॉल्स करत असल्याने जेव्हा पोलिसांनी त्याचे फोन सर्व्हिलन्सवर ठेवले, तेव्हा त्याचे लोकेशन हे श्रीलंका अथवा कोल्हापूर दाखवायचे. प्रत्यक्षात तो डोंबिवलीतील आपल्या भाड्याच्या घरातून कॉल्स करत असायचा. ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांनी तातडीने त्याला जेरबंद केले. मोपलवार यांच्याकडून खंडणी वसूल केल्यावर श्रीलंकेला पळून जाण्याचा त्याचा बेत होता, अशी कबुली त्याने चौकशीत दिल्याचे समजते.
मांगलेने खंडणी मागितली तेव्हा मोपलवार यांना त्याने भेटीसाठी बोलवले होते. दोन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये त्यांच्यात चर्चा झाली. या दोन्ही हॉटेल्सचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मागवले आहे. हे फुटेज पुरावा म्हणून वापरण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे.