‘मोराची बायको’ अभ्यासक्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:00 AM2019-06-15T00:00:43+5:302019-06-15T00:05:10+5:30
येले यांचे बालपण भाडुंप येथे गेले.
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : कविता, कथा आणि नाटक या तिन्ही साहित्य प्रकारांत लीलया मुशाफिरी करणारे नवोदित लेखक किरण येले यांच्या ‘मोराची बायको’ या कथा संग्रहातील शीर्षक कथेचा यंदाच्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बीएच्या अभ्यासक्रमातील मराठी विषयात समावेश झाला आहे. दरम्यान, या अभ्यासक्रमात जुने-नवे लेखक आणि कवींच्या साहित्य प्रवाहाचा समावेश आहे, अशी माहिती येले यांनी दिली.
येले यांचे बालपण भाडुंप येथे गेले. ते १९९७ मध्ये अंबरनाथ येथे स्थायिक झाले. ग्रंथाली प्रकाशनाने त्यांचा ‘मोराची बायको’ हा कथासंग्रह १ जानेवारी २०१८ ला प्रकाशित केला. पहिली आवृत्ती हातोहात संपल्याने या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती १ सप्टेंबर २०१८ ला प्रसिद्ध झाली. तसेच अनेक मान-सन्मान या कथासंग्रहाने मिळविलेले आहेत. मान्यवर समीक्षकांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून साक्षेपी भाष्य या कथासंग्रहावर केले आहे. कल्याणच्या काव्यमंच संस्थेने दोन तासांचा कार्यक्रमही सादर केला होता. या कथासंग्रहात सात कथा आहेत. त्यातील एक कथेवर फिल्म बनविण्यात येत आहे. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘बाई, आमिबा आणि स्टील ग्लास’ या नाटकाचे लेखनही येले यांनी केले आहे.
‘मोराची बायको’ ही एका नात्याविषयीची कथा असून, त्यात कल्पना आणि वास्तव मांडलेले आहे. या कथेचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याचे येले यांना आधी बाहेरून समजले. त्यानंतर शिक्षण खात्याने त्यांना ई-मेल पाठवून ‘मोराची बायको’चा अभ्यासक्रमात समावेश
क रण्याची परवानगी मागितली. त्याला येले यांनी परवानगी दिली.
अनेक पुरस्कारांचे मानकरी
येले यांची तीन नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली आहेत. तसेच त्यांचे दोन कवितासंग्रहदेखील प्रकाशित झाले आहेत. मालिकाचे लिखाणही त्यांनी केले आहे. येले यांना डॉ. अनंत लाभसेटवार फाउंडेशनचा (यूएसए) साहित्य पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार, डॉ. द. ता. भोसले वाचनालय, सोलापूर यांचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार आणि सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा पु. ना. पंडित पुरस्कार मिळाला आहे.