दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत २१ लाखांहून अधिक ठाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:52+5:302021-08-12T04:44:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येत्या १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळणार ...

More than 21 lakh Thanekars waiting for the second dose | दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत २१ लाखांहून अधिक ठाणेकर

दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत २१ लाखांहून अधिक ठाणेकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : येत्या १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करताच राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांवर नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र, ठाणे शहरात परिस्थिती काहीशी वेगळी आहे. शहरात ठाणे महानगरपालिकेची ५८ हून अधिक लसीकरण केंद्रे आहेत. तर सिव्हिल रुग्णालयात एक केंद्र आहे. मात्र, गेले अनेक दिवस लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्राबाहेर लसीकरण केंद्र बंद असल्याची पाटी बघून ठाणेकरांना माघारी परतावे लागत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी दोन महिने होऊनही प्रतीक्षेत राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत २२ लाख ठाणेकरांपैकी अवघ्या दोन लाख ६९ हजार ठाणेकरांनीच दुसरा डोस घेतला आहे. त्यातही ठाणे शहरात वारंवार लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण बंद ठेवले जात असल्याने १५ ऑगस्टपासून रेल्वेने प्रवास कसा करायचा, असा सवाल आता ठाणेकर करीत आहेत.

एक ते दीड महिन्यापासून ठाण्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कधी कधी तर आठवडाभर लसीकरण बंद असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, लोकल प्रवासाबाबत मागील काही दिवसांपासून ओरड सुरू होती. त्यानुसार १५ ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर आता रेल्वेतून प्रवास करण्यासाठी ठाणेकर आतुर झाले आहेत. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी ठाणेकर पहाटेपासूनच लसीकरण केंद्राच्या बाहेर रांगा लावून असतात. परंतु, त्यांची घोर निराशाच होताना दिसत आहे. दोन दिवस लसीकरण सुरू तर चार दिवस बंद अशी स्थिती ठाण्यात सध्या सुरू आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा लसीकरण सुरू होते, तेव्हा तेव्हा वेळेस लसीकरण केंद्रांवर रांगाच रांगा दिसत आहेत. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ५८ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु, ती सत्ताधारी शिवसेनेच्याच नगरसेवकांच्या प्रभागात घेतली जात असल्याने इतर पक्षांचे नगरसेवक नाराज झाले आहेत. यावर अद्यापही तोडगा काढता आलेला नाही. इतर नगरसेवकांनी पत्रव्यवहार करूनही अद्याप त्यांना लस मिळालेली नाही.

आता दुसरा डोस मिळावा म्हणून ठाणेकर सध्या दाही दिशा फिरत आहेत. जिथे लस मिळेल त्या ठिकाणी जाण्याची तयारी ठाणेकरांची आहे. परंतु, वारंवार लसीचे केंद्र बंद राहत असल्याने ती मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रदेखील आठवड्यातून एक ते दोन दिवसच सुरू असते. अन्यथा येथे लस नसल्याची पाटी लागलेली दिसून येत आहे. मंगळवारीदेखील ठाणेकरांना लस न घेताच घरी परतावे लागले.

.........

कोरोनामुळे पगार कमी झाला आहे. परंतु, नोकरी टिकविण्यासाठी आजपर्यंत बसने प्रवास करीत आहे. त्यात शासनाने दुसरा डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे, याचा आनंद जरी झाला असला तरीदेखील दुसरा डोस केव्हा मिळणार, असा प्रश्न आम्हाला सतावत आहे.

(महेश राठोड - ठाणेकर)

दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वेचा प्रवास मिळणार असल्याने काहीसा आनंद आहे. त्यामुळे खिशाला बसणारी कात्रीदेखील वाचणार आहे. परंतु, दुसरा डोस घेण्यासाठी किती वेळा केंद्रावर खेटा घालायच्या, असा प्रश्न आमच्यापुढे आहे. पहाटेपासून रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही, त्यामुळे रेल्वेचा प्रवास केव्हा करायचा, याचे उत्तर शासनानेच द्यावे.

(राजेश भारती - ठाणेकर)

आतापर्यंत झालेले लसीकरण

ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाख असून, आतापर्यंत ३९ टक्के लसीकरण झाले आहे. यामध्ये २७ टक्के पहिला डोस तर दुसरा डोस ११ टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटातील पहिला डोस १४ टक्के तर दुसरा डोस २ टक्के नागरिकांनाच मिळाला आहे. तर ४५ वयोगटापुढील ४१ टक्के नागरिकांना पहिला डोस तर दुसरा डोस १९ टक्के नागरिकांना मिळाला आहे. आतापर्यंत आठ लाख ५८४ जणांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये पाच लाख ३१ हजार ५६४ जणांना पहिला तर दोन लाख ६९ हजार २० जणांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे.

Web Title: More than 21 lakh Thanekars waiting for the second dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.