२१ हजारांहून अधिक खेळाडू धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:22 AM2018-09-01T04:22:08+5:302018-09-01T04:22:43+5:30
वर्षा मॅरेथॉनसाठी ठाणे झाले सज्ज : महापौरांची माहिती; खड्डेही बुजवले
ठाणे : ठाणे महापालिकेच्या २९ व्या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी ठाणेनगरी सज्ज झाली आहे. रात्रीचा दिवस करून शहरातील बहुतेक भागांतील खड्डेही बुजवण्यात पालिकेला काही प्रमाणात का होईना यश आले आहे. त्यानुसार, या स्पर्धेत तब्बल २१ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
या स्पर्धेचा खर्च यंदा ६५ लाखांवरून ४० लाखांवर आला आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. या स्पर्धेमध्ये २१ किमी पुरुष गट आणि १५ किमी महिला गट व १० किमी १८ वर्षांवरील मुले (खुला गट) या तीन मुख्य स्पर्धांतील स्पर्धकांना टायमिंग चीप देण्यात येणार आहे. तर, विविध १० गटांत ही स्पर्धा पार पाडली जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठीचीही स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या पहिल्या पाच ज्येष्ठांची शारीरिक चाचणी खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत करण्यात येईल.
रविवारी ६.३० वा. महापालिका मुख्यालय चौकातून जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात होईल. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल. या समारंभास खा. राजन विचारे, श्रीकांत शिंदे, विनय सहस्रबुद्धे, कुमार केतकर, आ. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, संजय केळकर, निरंजन डावखरे, जितेंद्र आव्हाड, उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, क्रीडा व समाजकल्याण सांस्कृतिक समिती सभापती दीपक वेतकर, ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, समीर उन्हाळे, महाराष्ट्र हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश
पर्यावरणप्रेमी रन फॉर एन्व्हायर्नमेंट या स्पर्धेत सहभागी होणार असून पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेश देणार आहेत. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अवयवदानाची चळवळ व्यापक स्वरूपात समाजात पोहोचावी, यासाठी मृत्यूनंतर अवयवदान करणाऱ्यांचे कुटुंबीय व अवयवांमुळे ज्यांना नवीन आयुष्य मिळाले आहे, असे लाभार्थीही या स्पर्धेत धावणार आहेत.