२३ हजारांपेक्षा जास्त शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:00+5:302021-07-05T04:25:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्राची ‘प्रधानमंत्री पीकविमा’ योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामातील संकटावर मात करून नवसंजीवनी देणारी आहे. गेल्या ...

More than 23,000 farmers deprived of crop insurance benefits | २३ हजारांपेक्षा जास्त शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित

२३ हजारांपेक्षा जास्त शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : केंद्राची ‘प्रधानमंत्री पीकविमा’ योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामातील संकटावर मात करून नवसंजीवनी देणारी आहे. गेल्या वर्षांच्या भात, नागली व फळबाग विम्यापोटी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३ कोटींची भरपाई मिळाली. या जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील २३ हजारपेक्षा अधिक शेतकरी दोन्ही जिल्ह्यांत कोट्यवधींच्या विमा भरपाई रकमेपासून आजपर्यंत वंचित आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात या प्रधानमंत्री पीकविमा योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील भात व नागली पिकासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स व फळपिकासाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपन्यांनी, तर पालघर जिल्ह्यातील भात व नागली पिकासाठी एचडीएफसी इरगो इन्शुरन्स व फळपिकासाठी ॲग्रिकल्चर कंपन्यांनी हजारो शेतकऱ्यांचा शेकडो हेक्टर शेतीचा विमा काढलेला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेखाली ठाणे जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार ३२ हजार ६५० शेतकऱ्यांनी भात व नागली पिकांचा विमा काढला होता. त्यासाठी या शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाख ३८ हजारांचा हप्ता भरला होता. जिल्ह्यातील २८ हजार ७२९ शेतकऱ्यांना २३ कोटी ९८ लाख ९२ हजार रुपयांची भरपाई या शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. तब्बल तीन हजार ९२१ शेतकरी या विमा भरपाईच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.

ठाणे जिल्ह्यातील चार हजार ४४७ शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागांच्या तब्बल एक कोटी ४० लाख ४७ हजारांचा विमा हप्ता भरला होता. अवघ्या १६ शेतकऱ्यांना फक्त चार लाख ३० हजार रुपयांची भरपाई मिळालेली आहे. या फळबाग विमा भरपाईच्या लाभापासून ठाणे जिल्ह्यातील तब्बल चार हजार ४३१ शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तर पालघर जिल्ह्यातील ९१० शेतकऱ्यांना भात व नागलीच्या पिकांसाठी दोन कोटी चार लाख ३५ हजारांची विमा भरपाई मिळाली आहे. या भात व नागलीचा विमा काढलेल्या तब्बल १९ हजार १७४ शेतकरी या विमा भरपाईच्या लाभापासून वंचित आहेत. तर अवघ्या दोन हजार ३८ शेतकऱ्यांना त्यांच्या फळबाग विम्यापोटी चार कोटी ९२ लाख २३ हजार रुपयांची भरपाई मिळाली आहे.

----------

पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न सुरू

यंदाच्या खरीप हंगामासाठी पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंतची मदत दिलेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षाच्या विमाभरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे. या वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संबंधित कंपन्यांच्या संपर्कात आहे. यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ करून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहाेत, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: More than 23,000 farmers deprived of crop insurance benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.