लोकमतमुळे अल्पावधीत ५० हजारांहून अधिक दात्यांनी केले रक्तदान : गिरिजा ओक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:28+5:302021-07-19T04:25:28+5:30
ठाणे : राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना ‘लोकमत’ रक्ताचे नाते हा उपक्रम राबवून अनोखे रक्ताचे नाते जपले. लोकमतमुळे अल्पावधीतच ...
ठाणे : राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना ‘लोकमत’ रक्ताचे नाते हा उपक्रम राबवून अनोखे रक्ताचे नाते जपले. लोकमतमुळे अल्पावधीतच ५० हजारांहून अधिक दात्यांनी रक्तदान केले, ही कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक हिने रविवारी ठाण्यात काढले.
लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त सध्या राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातही लोकमत आणि कच्छ युवक संघ, ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मासुंदा तलावासमोरील श्री ठाणा वर्धमान स्थानकवासी जैन संघ यांच्या सभागृहात या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन गिरीजा हिच्या हस्ते झाले. त्यावेळी तिने हे प्रतिपादन केले. ती पुढे म्हणाली, ज्याला जी गरज आहे, त्याप्रमाणेच त्याला ती मदत मिळाली तर तिचे महत्व अधिक अधोरेखित होते. लोकमतने सध्याची राज्याची गरज जाणली. त्यानुसारच हा उपक्रम राज्यभर सुरु केला. या उपक्रमाच्या आधी राज्यात केवळ १९ हजार युनिट इतकाच रक्त पुरवठा होता. या उपक्रमातून अल्पावधीतच ५० हजारांहून अधिक दात्यांनी रक्तदान केले. एकीकडे रक्ताची निकड आहे, तर दुसरीकडे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे अशी शिबिरेही होत नाहीत. त्यातच कोरोनामुळे अनेकांच्या मनात भीतीही आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकमतने कोरोनाचे सर्व नियम पाळून हा उपक्रम राबविला, हे निश्चितच स्तुत्य आहे. इतरांनीही याचा आदर्श घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन गिरिजा हिने यावेळी केले.
यावेळी कच्छ युवक संघटनेचे लक्ष्मीचंद गाला, संघटनेचे विश्वस्त दिलीप रांभिया, काँग्रेस सेवा दल, ठाणे शहर अध्यक्ष शेखर पाटील तसेच कच्छ युवक संघटनेचे ठाणे शहर संयोजक गिरीश भेदा, सह संयोजक वसंत नागडा, वागळे इस्टेट संयोजक धीरज लालन आणि ठाणे शहर रक्त संकलक योगेश गंगर आणि लोकमतचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे आदी उपस्थित होते.
* यावेळी गिरीशभाई भेदा यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. एका दात्यामुळे सात रुग्णांना रक्ताचा वेगवेगळ्या प्रकारे फायदा होतो, असे डॉ. सुनील करकडे यांनी यावेळी सांगितले. एका कठीण प्रसंगी एका तासात चार बाटल्या कच्छ युवक संघटनेच्या गिरीश भेदा यांनी उपलब्ध केल्याने एका रुग्णावरील शस्त्रक्रहया यशस्वी झाल्याचेही डॉ. करकडे यांनी आवर्जून सांगितले.
...........................
फोटो कॅप्शन: १८ ठाणे डोनेशन प्रमाणपत्र
रशियातून आलेल्या तरुणाचेही ठाण्यात रक्तदान...
रशियात वैद्यकीय शिक्षण घेणारे मार्मिक सोनी हे ठाण्यात आपल्या नातेवाईकांकडे आले होते. त्यांनीही रविवारी मासुंदा तलावासमोरील श्री ठाणा वर्धमान स्थानकवासी जैन संघाच्या सभागृहात रक्तदान केले. या दात्याला प्रमाणपत्र देताना अभिनेत्री गिरिजा ओक.