एका शटरबंद दुकानात ८० पेक्षा जास्त नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:23+5:302021-05-12T04:41:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील प्रसिद्ध गजानन मार्केटमधील एका शटरबंद दुकानात ८० पेक्षा जास्त नागरिक कपड्यांची खरेदीविक्री करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील प्रसिद्ध गजानन मार्केटमधील एका शटरबंद दुकानात ८० पेक्षा जास्त नागरिक कपड्यांची खरेदीविक्री करीत असल्याचा प्रकार उघड झाला. महापालिका व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून दोन दुकाने सील केली, तसेच दंडात्मक कारवाईही केल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगरात नावालाच संचारबंदी असून शटर बंद करून दुकानात सर्रास विक्री सुरू आहे. कॅम्प नं-२ मधील प्रसिद्ध जपानी व गजानन कपडे मार्केटसह शहरातील बहुतांश दुकानदार बाहेरून शटर बंद करून दुकानात कोरोना नियमांचे उल्लंघन करून विक्री करीत आहेत. याबाबतची कल्पना पोलिसांसह महापालिका अधिकाऱ्यांना असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नगरसेवक राजेश टेकचंदानी यांच्या सतर्कतेमुळे पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दोन दुकानांवर मंगळवारी सकाळी कारवाई केली. शगुन नावाच्या दुकानात तब्बल ८० पेक्षा जास्त नागरिक कपड्याची खरेदी करीत असल्याचे उघड झाले.
महापालिकेने गेल्या काही महिन्यांत दुकानाचे शटर बंद करून आतमध्ये कपड्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांसह विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून ३० लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. महापालिकेची कारवाई सुरू असली तरी, शहरात शटरबंद दुकानांत आतून सर्रासपणे विक्री सुरू असून यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस व महापालिकेने कोरोना काळात तरी अशा दुकानांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.