नोकरदार आईकडून घेतली जाते अधिक काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:55 AM2019-03-08T00:55:15+5:302019-03-08T00:55:20+5:30

शहराला ‘बेडरूम सिटी’ म्हणून संबोधले जाते. या शहरातील पतीपत्नी नोकरी करतात.

More care is taken by employer mother | नोकरदार आईकडून घेतली जाते अधिक काळजी

नोकरदार आईकडून घेतली जाते अधिक काळजी

googlenewsNext

- जान्हवी मोर्ये 

डोंबिवली : शहराला ‘बेडरूम सिटी’ म्हणून संबोधले जाते. या शहरातील पतीपत्नी नोकरी करतात. नोकरदार महिलेला मातृत्वाच्या आणि पित्याला पितृत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडता येत नाहीत. त्यामुळे मुलांना पाळणाघरांत ठेवावे लागते, असे मत पाळणाघर चालवणाऱ्या भक्ती म्हात्रे यांनी व्यक्त केले. त्यांची आई माई गोरेगावकर यांनी १९९४ मध्ये सुरू केलेले पाळणाघर डोंबिवलीत प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात भक्ती या आईच्या पाळणाघराचा वारसा चालवत आहेत. पाळणाघरात मुलांना प्रेम आणि पालकांना विश्वास द्यावा लागतो, असे त्या सांगतात.
माई गोरेगावकर यांचा पालकांमध्ये दबदबा तर, मुलांना धाक होता. भक्ती यांच्या पाळणाघरात ४० मुलांनाच प्रवेश दिला जातो. पाळणाघराची मागणी वाढत असून सर्व सोयीसुविधांनी युक्त, जास्त वेळ मुलांची काळजी घेणारी पाळणाघरे, ही नव्या पिढीची मागणी असल्याचे त्या सांगतात. भक्ती यांचे पाळणाघर या गरजा पूर्ण करत असल्याने पालक त्याला प्राधान्य देतात. मुलांची काळजी घेण्यासाठी चार मावशा आहेत. तीन महिन्यांपासूनची तान्ही मुले पाळणाघरात येतात. माई यांनी सुरू केलेले उपक्रम भक्ती यांनीही पुढे नेटाने सुरू ठेवले आहेत. मुलांसाठी वेगवेगळे सण साजरे केले जातात. त्यामुळे दहीहंडीला बालकृष्ण आपल्या लीलांचा काला करतात, तर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांची पाळणाघरात शोभायात्रा निघते. लहानग्यांकरिता निबंध, कविता, फॅन्सी ड्रेस अशा स्पर्धा घेतल्या जातात. मुलांचे घरी पालकांशी वागणे आणि पाळणाघरातील वर्तन यानुसार गुणवंत बालक पुरस्कार दिले जातात.
हल्ली मुलांना जेवताना मोबाइलवर गेम खेळण्याचे वेड लागले आहे. मात्र, आमच्या पाळणाघरात आम्ही मुलांना मोबाइल देत नाही. ठरावीक वेळात टीव्ही पाहू दिला जातो. मागच्या वर्षी डोंबिवलीतील एका पाळणाघरात काही गैरप्रकार घडला होता. त्यामुळे काहींनी आमच्याकडे येऊन सुरक्षिततेविषयी विचारणा केली होती. आमच्याकडे मुलींच्या सुरक्षिततेसाठी बाहेरच्या अनोळखी व्यक्तीला पाळणाघरात सोडले जात नाही. सगळा कारभार स्त्रियांकडून हाकला जात असून पुरुषांना त्याठिकाणी प्रवेशच नाही.
पाळणाघरे मुलांना शेअरिंग शिकवतात. मुले एकलकोंडी होऊ नये, यासाठी काळजी घेतात. काहींच्या घरी आजीआजोबा असतात. मात्र, ते वार्धक्याने थकलेले असतात. त्यांना व्याधी, आजारपण असल्याने त्यांच्याकडून मुलांची योग्य काळजी घेतली जाईलच, याची खात्री नसते. त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवण्याकडे आणि ही संस्कृती स्वीकारण्याकडे कुटुंबांचा कल वाढला आहे, असे भक्ती यांनी सांगितले. आताच्या मुलांना खूप प्रश्न विचारण्याची इच्छा असते. अशी मुले घरी राहिली, तर त्यांचे कुतूहल शमत नाही. मात्र, पाळणाघरात ते मोठ्या मुलांना आपल्या मनातील शंका विचारू शकतात. त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी, यासाठी अभ्यासपूर्ण खेळ शिकवले जातात.
डोंबिवलीतील स्वाती वरघडे या १२ वर्षांपासून पाळणाघर चालवत आहेत. त्या सांगतात की, पूर्वी मी ुपाळणाघर चालवत होते, आता ‘डे केअर सेंटर’ चालवत आहे. घर सांभाळून जे चालवले जाते, ते पाळणाघर आणि पूर्णवेळ एकट्या महिलेकडून चालवले जाते ते ‘डे केअर सेंटर’, असा या दोन्हींत फरक असल्याचे वरघडे सांगतात. दिवसभर वरघडे यांच्या डे केअर सेंटरमध्ये मुलांना योगा, संस्कारवर्ग, गायत्रीमंत्र आदी गोष्टी शिकवल्या जातात. सकाळी साडेसात वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत मुले सेंटरमध्ये असतात. नोकरदार महिलांच्या मुलांची ‘दुसरी आई’ पाळणाघर झाले आहे. डोंबिवलीत नोकरदार महिलांची संख्या वाढत असल्याने पाळणाघरांची गरजही वाढते आहे. वरघडे या दोन ठिकाणी ‘डे केअर सेंटर’ चालवतात. सेंटरमध्ये मुलांना कपड्यांच्या घड्या घालण्यापासून जेवणाचे ताट धुऊन ठेवण्यापर्यंत सगळी कामे स्वत: करावी लागतात. सेंटरमध्ये मुलांचा आहारतक्ता ठरलेला आहे. तरीदेखील काही पालक मुलांना आवडीचे पदार्थ देतात. वरघडे यांच्या मते, गृहिणी जितकी आपल्या मुलांची काळजी घेत नाही, त्यापेक्षा अधिक काळजी नोकरदार आईकडून घेतली जाते.
अनेक नोकरदार महिलांची मुले पाळणाघरात किंवा डे केअर सेंटरमध्येच ‘आई’ ही हाक मारायला शिकतात... हे कौतुकाचे बोबडे बोल सेंटरमधील आई किंवा मावशीच ऐकतात. त्यांनाच ती लहानगी ‘आई’ समजतात. अनेक मुले त्यांच्या जन्मदात्या आईला ‘घरी तू माझी आई असली, तरी पाळणाघरात माई हीच माझी आई आहे’, असे तोंडावर सांगतात. हे आम्ही केलेल्या संगोपनाला लाभलेले मोठे बक्षीस असते. रस्त्यातून जाताना कुणीतरी वयात आलेली मुलगी किंवा मिसरूड फुडलेलं पोर आई.. आई... अशी हाक मारत मागं धावत येतं, तेव्हा वरघडे यांचे मन सुखावते.

Web Title: More care is taken by employer mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.