क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:20 AM2017-08-02T02:20:27+5:302017-08-02T02:20:27+5:30
राज्यात क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करण्यास बंदी असताना, तिच्याकडे कानाडोळा करून बेधडक वाहतूक करणाºया वाहनांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत
ठाणे : राज्यात क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करण्यास बंदी असताना, तिच्याकडे कानाडोळा करून बेधडक वाहतूक करणाºया वाहनांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील तीन दिवसांत १७ केस दाखल करून तब्बल दोन लाखांहून अधिक दंड वसूल केल्याची माहिती आरटीओने दिली.
ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-नाशिक महामार्ग, घोडबंदर रोड आणि मुलूंड चेकनाका या मुख्य महामार्गावर ही मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आरटीओचे एकूण पाच वायूवेग पथक दिवस-रात्र तैनात केले आहेत.
या तैनात पथकांनी २९ ते ३१ जुलै दरम्यान, १७ केस नोंदवून त्यांच्या दोन लाख १८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये मुंबई-नाशिक महामार्गावर ३, घोडबंदर रोड आणि मुलूंड चेकनाका येथे प्रत्येकी ७ केसेस नोंदवल्या आहेत.
मोटार वाहतूक कायद्यात दंड शुल्क आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार कारवाई सुरू असून सरासरी प्रती टनाला चार हजार रुपये तो आकारण्यात आल्याची माहिती आरटीओच्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.