एमआरआय दरात आणखी हवी सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:45 AM2021-08-20T04:45:58+5:302021-08-20T04:45:58+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात असलेली एमआरआयची सुविधा सवलतीच्या दरात सुरू असली तरी अनेक गोरगरीब ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात असलेली एमआरआयची सुविधा सवलतीच्या दरात सुरू असली तरी अनेक गोरगरीब रुग्णांना तेवढे पैसेसुद्धा देणे शक्य होत नसल्याचा दावा बुधवार (दि. १८)च्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. त्यामुळे ही सुविधा गोरगरीब रुग्णांसाठी विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्यासाठी धोरण निश्चित करावे लागणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. असे असेल तरी त्यांना ही सुविधा मोफत द्यायची की आहे त्या दरात आणखी सवलत द्यायची, हे आता धोरण निश्चित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील तीन वर्षांपासून एमआरआयची सुविधा सवलतीच्या दरात सुरू आहे. या रुग्णालयामध्ये ठाणे तसेच ठाणे ग्रामीण भागातूनही रुग्ण येतात. महापालिकेने खासगी लोकसहभागातून एमआरआयची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती अत्यल्प दरात दिली जात आहे. या सुविधेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत असला तरी अनेक गरीब रुग्णांकडे सवलतीच्या दराची रक्कम भरण्याइतकेही पैसे नसतात. त्यामुळे अशा रुग्णांना ती विनामूल्य देण्याचा आग्रह बुधवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. तर, विनामूल्यऐवजी आणखी सवलत देण्याची सूचना काही नगरसेवकांनी केली. महापालिकेच्या महासभेने ठरवून दिल्याप्रमाणेच रुग्णांना सवलतीच्या दरात एमआरआयची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी असेल तर आणखी सवलत द्यायची की विनामूल्य द्यायची याचे धोरण ठरवावे लागेल, असे मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. हे धोरण गरीब, गरजू रुग्णांसाठी ठरवायचे असेल तर, निकषही ठरवावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर आता हे धोरण तयार करण्यात येऊन पुढील दिशा ठरविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.