कोरोनापेक्षा इतर आजारांनी मृत पावलेले अधिक; कोरोनानं २,१३१ जणांचा मृत्यू, तर अन्य आजारांमुळे ३९,४७२ मृत!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:07 PM2022-06-17T13:07:33+5:302022-06-17T13:07:49+5:30
मागील अडीच वर्षे कोरोनामुळे हाहाकार माजला होता. कोरोनामुळे अनेकांचे प्राण हिरावले गेले. मात्र, ठाणे शहरात या कालावधीत कोरोनामुळे २ हजार १३१ जणांचा मृत्यू झाला.
ठाणे :
मागील अडीच वर्षे कोरोनामुळे हाहाकार माजला होता. कोरोनामुळे अनेकांचे प्राण हिरावले गेले. मात्र, ठाणे शहरात या कालावधीत कोरोनामुळे २ हजार १३१ जणांचा मृत्यू झाला. मात्र, त्याहीपेक्षा इतर आजारांनी याच कालावधीत ३९ हजार ४७२ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत ५० हजार ४१० जणांचा जन्म झाल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे मृत्यू झाले. अनेकांचे संसार उदध्वस्त झाले. या महामारीच्या काळात ५० हजार ४१० मुलामुलींचा जन्म झाला. या कालावधीत तब्बल ४१ हजार ६०३ मृत्यूची नोंद असून यापैकी २,१३१ मृत्यू कोरोनामुळे झाले. २,०२३ बालकांचे मृत्यू झाले. या अडीच वर्षांच्या कालावधीत ८ हजार ८०८ जणांचा जीव वाचला.
नौपाडा-कोपरी विभागात ८ हजार ४०४ तर ठाण्यातील कोलशेतमध्ये सर्वात कमी १२९ मृत्यू झाल्याची नोंद आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत पुरुषांच्या मृत्यूंचे प्रमाण हे २५ हजार ४०, तर स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे १७ हजार ९९ नोंदवण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जून ते सप्टेंबर या काळात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण हजारांहून अधिक होते. पहिल्या लाटेत पुरुष मृत्यू प्रमाण १० हजार ८१९, तर दुसऱ्या लाटेत ११ हजार २३ एवढे होते. याच कालावधीत कमी वजनाच्या, कमी दिवसांच्या बालकांचे मृत्यू झाले.
दोन हजार २३ बालकांचा झाला मृत्यू
जुळी गर्भधारणा, मातेला संसर्ग, पोषण आहाराची कमतरता, जन्मत: व्यंग यामुळे बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ९७२ बालकांचा मृत्यू ओढवला. २०२१ मध्ये ७३० आणि जानेवारी ते मे २०२२ या पाच महिन्यांत ३२१ अशा जवळपास २ हजार २३ बालकांचा मृत्यू झाला.