ठाण्यात कोरोनापेक्षा इतर आजारांचे मृत्यू अधिक; महापालिकेची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:44 AM2020-08-25T00:44:56+5:302020-08-25T00:45:06+5:30
कोरोनाने मृत्यूचे प्रमाण नऊ रुग्णांमागे एक
ठाणे : ठाण्यातील कोरोनाचा आलेख हळूहळू खाली येऊ लागला असला, तरी लोकांच्या मनात असलेली कोरोनाची भीती मात्र नाहीशी होताना दिसत नाही. त्यातच, इतर आजारांनी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांनाही कोरोना संसर्गाशी जोडले जात असल्याने हे भय आणखी वाढले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोरोनाने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसत आहे. गेल्या साडेचार महिन्यांत झालेल्या ४,८०० एकूण मृत्यूंपैकी ७८७ हे कोरोनाचे बळी असून उर्वरित ४,०१३ मृत्यू हे नैसर्गिक आणि इतर आजारांचे आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाला चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. यामध्ये मुंबईसह ठाणे आघाडीवर आहे. या काळात ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या १,८५० असून आजवर कोरोनाने केवळ ७८७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेकडे आहे. गेल्या साडेचार महिन्यांची ठाणे महापालिका हद्दीतील मृतांची आकडेवारी पाहता या काळात एकूण ४,८०० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रत्यक्ष कोरोनामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पण, असे असतानाही सामान्य जनतेमध्ये कोरोनाची जास्त भीती आहे.
यामुळे झाले आहेत मृत्यू
मृतांच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकली असता त्यामध्ये कोरोनाने मृत पावण्याचे प्रमाण नऊ रुग्णांमागे एक असे आहे. त्यातही जे रुग्ण कोरोनामुळे मृत झाल्याचे सांगण्यात येते, त्यातील बहुतांश व्यक्ती इतर आजारांनी बाधित होत्या, असे दिसते. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, क्षय, हृदयविकार आदी आजारांसह ५० वर्षांवरील नागरिकांचाही समावेश आहे. ठाण्यातील अनेक रुग्णालये कोविड केल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण आजारी असतानाही इतर रुग्णालयात जाण्यास घाबरतात. तर, अनेक जणांना कोरोनाच्या भीतीने हृदयरोगासारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे.
ठाण्यात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, रस्ते अपघात अशा अनेक कारणांनी नागरिकांचे मृत्यू होतात. साडेचार महिन्यांत सर्वाधिक मे आणि जूनमध्ये रुग्ण दगावले असून २५७५ रुग्णांवर ठाण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले आहेत. गेल्या वर्षी मार्च ते जुलैमध्ये सुमारे ३,७०० रुग्णांवर ठाणे महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, यंदा साडेचार महिन्यांत ४,८०० रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.