उल्हासनगरात लाखोचा खर्च करूनही अर्धेअधिक हॅन्डपंप बंद; पाणी टंचाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:06 PM2021-02-05T19:06:40+5:302021-02-05T19:06:48+5:30
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा मिळण्यासाठी ४५० कोटीच्या पाणी पुरवठा वितरण योजनेचा फज्जा उडाला असून दरवर्षी लाखो रुपये खर्चूनही अर्धेअधिक हॅण्डपंप बंद आहेत. याप्रकाराने नागरिकांवर पाणी टंचाईची तलवार टांगती उभी ठाकल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसीने गेल्या आठवड्यात दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीच्या निर्णयामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. शहर पूर्वेतील अनेक ठिकाणी दिवसाआड पाणी पुरवठा होत असून एमआयडीसीच्या या निर्णयामुळे पूर्वेत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे यांनी व्यक्त केली. तसेच प्रभाग समिती क्रं-४ मध्ये एकूण ४६ हॅण्डपंप असून त्यापैकी २२ हातपंप बंद आहेत. हीच परिस्थिती शहराची असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.
कोरोना महामारीच्या दरम्यान महापालिकेचे उत्पन्न ठप्प पडल्याने, गेल्या सहा महिन्यांचे पाणी बिल अदा करण्यात न आल्याने, एमआयडीची पाणी थकबाकी वाढली आहे. यामुळे महापालिकेवर केंव्हाही पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा मिळण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्याच्या मदतीने ४५० कोटी पेक्षा जास्त किंमतीची पाणी पुरवठा वितरण योजना राबविली. मात्र योजनेचा फज्जा उडून सर्वत्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र शहरात आहे. पाणी टंचाईची झळ नागरिकांना बसू नये म्हणून महापालिका बंद पडलेले हातपंप दरवर्षी दुरुस्ती केले जाते. दुरुस्तीवर कोट्यवधीचा खर्च केल्यावर अर्धेअधिक हातपंप बंद असल्याचे उघड झाले आहे. हातपंपच्या दुरुस्तीवर व इतर कामावर होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी मागितल्याने, पाणी पुरवठा विभागात खळबळ इडली आहे.
हातपंपाची दुरुस्तीचे संकेत
महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी शहरातील हातपंप, विधुत पुरवठा याबाबतची माहिती घेण्याचे संकेत दिले. पाणी टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीकोणातून उपाययोजना सुरू करून बंद पडलेले हातपंप सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.