जिल्ह्यात महिलांपेक्षा पुरुषांना जास्त टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:22 AM2021-01-03T01:22:50+5:302021-01-03T01:22:58+5:30
आरोग्यवर्धिनी उपक्रम : आरोग्य तपासणी
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील ३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांची रक्तदाबतपासणी, समुपदेशन व औषधोपचार केले जात आहेत. या तपासणीत जिल्ह्यातील पुरुषांचा रक्तदाब जास्त आढळला आहे. त्यावरून महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त टेन्शन घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागात ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमाअंतर्गत आरोग्यवर्धिनी उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे स्तरावर आशा, आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून आरोग्य तपासणी सुरू आहे. यात प्राधान्याने रक्तदाबतपासणी, समुपदेशन, औषधोपचार रहिवाशांच्या घरी जाऊन केले जात आहेत. या वेळी केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात पुरुष जास्त टेन्शनमध्ये वावरत असल्याचे रक्तदाबाच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
रक्तदाब वाढण्याचे कारण
वाढते वय, कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, असंतुलित आहार, शारीरिक हालचाली, व्यायामाचा अभाव, तंबाखू, विडीचे सेवन, मद्यपान, ताणतणाव, बदलती जीवनशैली
काय काळजी घ्यावी?
जीवनशैलीत सुधारणा करण्याची गरज आहे. सकस आहार घेणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली वाढविणे, आठवड्यात १५० मिनिटे व्यायाम करणे, तंबाखू - विडीचे सेवन बंद करणे, मद्यपान टाळणे, मानसिक ताण कमी करणे, औषधोपचार नियमित चालू ठेवणे गरजेचे आहे.
सर्वांनी जीवनशैलीत सुधारणा करण्याची गरज आहे. यामुळे तर उच्च रक्तदाब व हृदयविकारासारखे आजार होण्याची शक्यता कमी करता येईल. ज्यांना उच्च रक्तदाबाची औषधे सुरू आहे, अशा रुग्णांनी नियमित सकस आहार घेणे व व्यायाम करण्यासह औषधोपचार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य
अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे.