ठाण्यातील १३०० घरांसाठी ५ हजारांहून अधिक अर्ज; PM आवास योजनेतील घरांना प्रतिसाद नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 06:32 AM2024-11-26T06:32:55+5:302024-11-26T06:33:44+5:30
कोकण मंडळाच्या आवास योजनेतील ११ हजार घरांना प्रतिसाद नाहीच
मुंबई - म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीने सुमारे ११ हजार घरे विक्रीसाठी काढण्यात आली आहेत. यामधील १५ आणि २० टक्के योजनेंतर्गत १३०० घरे होती. ठाण्यात असलेल्या १३०० घरांना १०० टक्के प्रतिसाद असून, या घरांसाठी सुमारे पाच हजारांहून अधिक अर्ज आले होते. ही सगळी घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या गटातील आहेत. मात्र, पंतप्रधान आवास योजनेमधील १० ते ११ हजार घरांना अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही, अशी माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली. त्यामुळे आता या घरांची विक्री व्हावी म्हाडाकडून सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेमधील १० ते ११ हजार घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. विरार, बोळींज, शिरढोण येथे असलेली घरे दूर आहेत. मात्र, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आता ही घरे विकली जावीत म्हणून या घरांची अधिकाधिक जाहिरात केली जाणार आहे. लोकांपर्यंत या घरांची माहिती पोहोचविली जाणार आहे. सोशल मीडियाचा यासाठी वापर केला जाणार आहे. दुसरीकडे कोकण मंडळाची २२०० घरे लॉटरीसाठी आहेत. या घरांनाही कमी प्रतिसाद आहे. निवडणुका संपल्या असून, लोकांपर्यंत या घरांची माहिती पोहोचविली जाणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत अर्जदार अपात्र ठरण्याचे प्रमाण कमी असते. कारण यात अटी-शर्ती नाहीत. त्यामुळे अर्जदाराने मुदतीत पैसे भरले नाही तरच तो अपात्र ठरतो. अशावेळी प्रतीक्षा यादीवरील अर्जदाराला प्राधान्य दिले जाते.
पहिला कोण ?
एका घराला चार अर्ज आले असतील तर त्यातील पहिल्या अर्जदाराला संबंधित घर दिले जाते. यात दिवस, वेळ पाहिला जातो. उदा. सोमवारी तीन लोकांनी अर्ज केला. मंगळवारी एकाने अर्ज केला तर सोमवारचा अर्ज गृहीत धरला जातो. यातही कोणी किती वाजता अर्ज केला हे पाहिले जाते. हे सगळे पाहून यामध्ये सगळ्या अर्थाने जो पहिला असेल त्याला घरासाठी प्राधान्य दिले जाईल.
२५ टक्के रक्कम भरा
संबंधित अर्जदाराला पात्र असल्याचे कळविले जाईल. त्याने घराचे पैसे भरल्यानंतर म्हाडाकडून घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल. एकूण घराच्या किमतीपैकी २५ टक्के रक्कम संबंधिताने भरणे अपेक्षित असते.
सर्व प्रक्रिया ऑनलाइन
आता स्वीकृती पत्र देण्याची पद्धत नाही. म्हाडाकडून आता संबंधितांना पात्र ठरल्याचे मेसेज पाठविले जातात. आता कोणतीच प्रक्रिया ऑफलाइन नाही. सगळ्या प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांनी दलालांची मदत घेऊ नये, असे आवाहन म्हाडाने केले आहे.