लॅपटॉपपेक्षा मोबाइलचाच वापर अधिक;ऑनलाइन शिक्षणाचे ठाणे जिल्ह्यातील वास्तव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:53 AM2020-07-19T00:53:01+5:302020-07-19T00:53:21+5:30

शहरी भागांतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधांचा फायदा, मात्र खेड्यांत शिक्षणासाठी करावा लागतोय संघर्ष

More use of mobile than laptop; reality of online education in Thane district | लॅपटॉपपेक्षा मोबाइलचाच वापर अधिक;ऑनलाइन शिक्षणाचे ठाणे जिल्ह्यातील वास्तव 

लॅपटॉपपेक्षा मोबाइलचाच वापर अधिक;ऑनलाइन शिक्षणाचे ठाणे जिल्ह्यातील वास्तव 

Next

- स्नेहा पावसकर

ठाणे : कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या. गेली अनेक वर्र्षे काहीसे कठीण किंवा केवळ उच्चभ्रू लोकांपुरते मर्यादित वाटणारे आॅनलाइन शिक्षण आज मध्यमवर्गीय घराघरांतील मुलेही अगदी सहजपणे घेत आहेत आणि त्यात रमलेही आहेत. पालकही आपल्या मुलाचे आॅनलाइन शिक्षण सुरू असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगत आहेत.

लॉकडाऊनमुळे शाळा सुरू होणार नसल्या, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बहुतांश शाळांनी सुरुवातीपासूनच आॅनलाइनचा पर्याय निवडला. शाळांनी विद्यार्थ्यांचे तुकड्यांनुसार ग्रुप बनवले. तसेच त्यांचे ई-मेल आयडी आणि पासवर्ड तयार करून ते पालकांना पाठवले. आॅनलाइन शाळेच्या वेळा ठरवून दिलेल्या असून या ई-मेल आयडीवर लॉग इन करून तेथील इन्व्हिटेशनवर क्लिक करून क्लासरूम जॉइन करायचा असतो.

काही शाळांनी गुगलच्या माध्यमातून आॅनलाइन क्लास सुरू केले आहेत, तर अनेक शाळांनी स्वत:चे अ‍ॅप तयार केले असून त्याद्वारे मुलांना आॅनलाइन धडे दिले जात आहेत. अनेकांच्या घरी लॅपटॉप, कॉम्प्युटर असतात. मात्र, त्याला कॅमेरा असला तरच आॅनलाइन क्लासरूम जॉइन करता येते. त्यामुळे आॅनलाइन क्लासरूमसाठी घरोघरी पालकांचे मोबाइलच वापरले जातात. त्यामुळे अनेक घरांतून मुलेच दिलेल्या लिंक, अ‍ॅपद्वारे कनेक्ट होऊन स्मार्टली आॅनलाइन शिक्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. तांत्रिक कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला, तरीही मोबाइलवरून सुरू असलेले आॅनलाइन क्लास खंडित होत नाहीत. त्यामुळे आॅनलाइन शिक्षणासाठी मोबाइलचाच सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागांत विजेच्या लपंडावाने अडथळा
- जनार्दन भेरे 

भातसानगर : कोरोनामुळे आज ग्रामीण भागांतील नववी, दहावी, बारावीचे विद्यार्थी आॅनलाइनद्वारे शिक्षण घेत आहेत. शहरांत सर्व सुविधा असल्याने तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येत नाही. मात्र, ग्रामीण भागांत परिस्थिती वेगळी आहे. सकाळच्या वेळी पालकांची शेतावर जाण्याची घाई असते. अशा वेळी मुलांना पालकांचा मोबाइल मिळणे कठीण असते. विद्यार्थ्यांनाही अभ्यासाच्या वेळी कामाला जुंपले जाते. मग, अशा परिस्थितीत ग्रामीण विद्यार्थी आॅनलाइन अभ्यास कसा करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

आॅनलाइन शिक्षणाचा शहरी भागांत निश्चितच उपयोग होत असला तरी शहापूर, जव्हार, मोखाडा यासारख्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र त्याचा उपयोग होतोय, असे वाटत नाही. आज आॅनलाइन शिक्षण सकाळी ८ पासून सुरू होते. यावेळी घरातील माणसे शेतीच्या कामाच्या लगबगीत गुंतलेली असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांचा मोबाइल मिळणे अशक्य असते.

यावेळी घरातील मुलांना गुरे हाकणे, मजुरांना बोलावणे, त्यांना शेतावर घेऊन जाणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. गेल्या कित्येक दिवसांपासून शहापूर तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असून कधी रात्रीच्या वेळी, तर कधी विजेचे काम करायचे, या बहाण्याने सकाळपासूनच वीज गायब होते. अशावेळी मोबाइल चार्ज नसला तर विद्यार्थी शिक्षण कसा घेणार? तसेच अनेक भागांत मोबाइलला नेटवर्कच मिळत नाही, असे विद्यार्थी-पालक सांगतात.

बिरवाडी येथील कातकरीवाडीतील आदिम जमातीतील मनीषा लहानू मुकणे एक हुशार विद्यार्थिनी. भातसानगरमधील प्रकल्प विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे आईवडील मजुरी करतात. आदिम जमातीतील ही एकमेव विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे, हे विशेष.
‘कामावर गेले तरच सायंकाळी घरात चूल पेटते’

मनीषाच्या घरची परिस्थिती म्हणजे सकाळी कामावर गेले, तर संध्याकाळी घरातील चूल पेटणार. या मुलीच्या वडिलांकडे मोबाइल आहे, पण केवळ आलेला फोन घ्यायचा, बस्स! मग, स्मार्टफोन नसल्याने आॅनलाइन शिक्षणाचा या मुलीला काय उपयोग? ही केवळ मनीषाची व्यथा नसून अशीच अवस्था अनेक विद्यार्थ्यांची आहे. ते आजही या शिक्षणापासून वंचित आहेत. काहींना तर पालक मोबाइलच देत नाहीत. मग, त्यांनी कसे शिक्षण घ्यायचे, हा कळीचा मुद्दा आहे.

Web Title: More use of mobile than laptop; reality of online education in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.