जितके पाणी वापरात जेवढेेेच येणार पाणी बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:03+5:302021-07-17T04:30:03+5:30
ठाणे : मागील कित्येक वर्षांपासून कागदावर असलेली स्मार्ट मीटरची योजना आता खऱ्या अर्थाने मार्गी लागल्याचे दिसू लागले आहे. ...
ठाणे : मागील कित्येक वर्षांपासून कागदावर असलेली स्मार्ट मीटरची योजना आता खऱ्या अर्थाने मार्गी लागल्याचे दिसू लागले आहे. शहरात १ लाख ४० हजारपैकी ५७ हजार मीटर विविध ठिकाणी बसविले आहेत. यामध्ये पहिल्या टप्यात कमर्शिअल आणि इमारतधारक अशा ४३ हजार ग्राहकांना जुलैपासून जेवढे पाणी वापरले असेल तेवढेच बिल येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
दर तीन महिन्यांनी ही बिले दिली जाणार आहेत. परंतु, उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने आधी जेवढे बिल आकारले जात होते. त्यापेक्षा कमी बिले मीटरमुळे येणार असल्याची भीती पाणीपुरवठा विभागाला वाटत आहे. त्यामुळे उत्पन्नावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे या उद्देशाने ही स्मार्ट मीटर योजना राबविली आहे. दीड वर्षांपासून शहराच्या विविध भागात ही मीटर बसविण्याचे काम हाती घेतले आहे. शहरात १ लाख ४० हजार मीटर बसविले जाणार असून आतापर्यंत ५७ हजार मीटर बसविण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. शहरात १ लाख १३ हजार २२६ ग्राहक असून त्यातील ५७ हजार ग्राहकांच्या नळजोडण्यांना मीटर बसविले आहेत. यामध्ये ४ हजार ६६२ ग्राहक हे कमर्शिअल असून उर्वरित घरगुती आहेत. आता यातील ४३ हजार ग्राहकांचे मीटर रीडिंग घेतले असून त्यांना जुलैपासून बिले दिली जाणार आहेत.
उत्पन्नावर होणार परिणाम
मीटरप्रमाणे बिल आकारत असताना मागील वर्षी पाणीपुरवठा विभागाने महासभेत पाणीदरवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार १ हजार लीटर मागे ७.५० रुपये ऐवजी १३ रुपये आकारले जावेत, असे सांगितले होते. तर इमारतीच्या बिल्टअप एरियानुसार दर आकराले जावेत, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार ० ते २५० चौरस फुटापर्यंत २०० रुपये ऐवजी ३०० रुपये असा हा प्रस्ताव होता. परंतु, तो मंजूर न झाल्याने आता मीटरप्रमाणे जरी बिले लावली जाणार असली तरीदेखील महिन्याकाठी ग्राहकाला ११२ रुपयांच्या आसपास बिल येणार आहे. जे आधी २०० रुपये आकारले जात होते. त्यामुळे मीटर लावूनही पालिकेचा उत्पन्न वाढीचा जो काही उद्देश होता, तो यातून साध्य होणार नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.