सकाळी जन-गण-मन...दुपारी ढाक्कुमाक्कुम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 03:03 AM2017-08-16T03:03:15+5:302017-08-16T03:03:17+5:30
स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदनाची लगबग, दुपारनंतर दहीहंड्यांचा जल्लोष अशा संमिश्र वातावरणात मंगळवारी ठाण्यात स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडीचा उत्साह दिसला.
ठाणे : सकाळी स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदनाची लगबग, दुपारनंतर दहीहंड्यांचा जल्लोष अशा संमिश्र वातावरणात मंगळवारी ठाण्यात स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडीचा उत्साह दिसला. मात्र, या सोहळ्याला काँग्रेस नेते बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या निधनाच्या दु:खाची किनार लाभली होती. रात्री पूर्णेकर यांना ठाणेकरांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.
धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली टेंभी नाक्यावरील ‘मानाची दहीहंडी’ व जांभळी नाक्यावरील खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा ‘महादहीहंडी उत्सव’ आवाजाची मर्यादा राखत साजरा झाला. जांभाळी नाक्यावरील हंडीला केवळ पाच थरांची मर्यादा ठेवण्यात आली होती. यामुळे सायंकाळपर्यंत सुमारे ७० गोविंदा पथकांनी या ठिकाणी सलामी दिली होती. कोपरीतील ‘शिवतेज’ महिला गोविंदा पथकाने पाच थर लावून हंडी फोडून २५ हजारांचे बक्षीस मिळवले.
टेंभी नाक्यावर फिफा फिव्हर
टेंभी नाका मित्र मंडळाची ‘ठाण्याची मानाची दहीहंडी’ उंच बांधली नसल्याचे, आयोजक आणि शिवसेनेचे ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार यांनी सांगितले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १०० पथकांनी सलामी दिली. नरेश म्हस्के, नगरसेवक सुधीर कोकाटे, विकास रेपाळे आणि हेमंत पवार यांच्या हस्ते गोंविदा पथकांना बक्षीस वाटप झाले. ‘फिफा - फॉर दी गेम फॉर दी वर्ल्ड’ हे घोषवाक्य असलेल्या ‘फिफा - यू १७ वर्ल्ड कप इंडिया २०१७’ या फूटबॉलच्या सामन्यात सहभागी होणाºया सर्व देशांचे ध्वज टेंभी नाक्यावर फडकत होते.
संस्कृतीचा प्रो गोविंदा
‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’ने प्रो कबड्डीच्या धर्तीवर ‘प्रो गोविंदा’ ही नवीन संकल्पना राबवली. उत्सवाच्या मैदानाला स्टेडीयमचे स्वरुप आले होते. यावेळी दोन गोविंदाच्या पथकांमध्ये थर लावण्याची स्पर्धा पाहावयास मिळाली. समान थर लावणाºया दोन गोविंदा पथकांमध्ये टॉस उडवला जात होता. त्यानंतर त्या दोघांपैकी जो कमीतकमी वेळेत थर रचेल, त्या गोविंदाला विजयी घोषित करून बक्षीस दिले गेले. उपविजेत्या पथकांचा देखील योग्य सन्मान झाला. यापूर्वी याच मैदानात ९ थर लावणाºया ‘जय जवान’ गोविंदा पथकाने प्रो गोविंदामध्ये अवघ्या १ मिनीट ३ सेकंदात ९ थर यशस्वीपणे लावले. दिवसभरात जवळपास १५० ते १६० गोविंदा पथकांनी हजेरी लावली. त्यामध्ये १० महिला गोविंदा पथकांचा समावेश असून, विलेपार्ले महिला पथकाने कमी वेळेत ६ थर लावले.
>‘संकल्प’च्या दहीहंडीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
‘संकल्प प्रतिष्ठान’ आयोजित दहीहंडी उत्सवात ठाणे मुंबईतील १६५ गोविंदा पथकांनी आपली नोंदणी केली होती तर ८० गोविंदा पथकांनी हजेरी लावून थर लावले. जोगेश्वरीच्या ‘कोकणनगर’गोविंदा पथकाने सर्वाधिक आठ थर लावले. त्याचबरोबर ६ महिला गोविंदा पथकांपैकी जोगेश्वरीच्या ‘रणझुंजार’ गोविंदा पथकाने पाच थर लावले. ठाण्यातील कोपरी येथील महिला गोविंदा पथकांनीही त्यांच्याबरोबर थर लावले.
>पूर्णेकरांना श्रद्धाजंली
उत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी कॉंग्रेस प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर यांना येथे श्रद्धाजंली वाहण्यात आली. तसेच स्वातंत्र्य दिन असल्याने राष्टÑगीताने उत्सवाची सुरूवात झाली.
>उच्च न्यायालयाच्या नियमांच्या अधीन राहून व क्र ीडा विभागाच्या धोरणानुसार हा दहीहंडीचा उत्सव साजरा केला आहे.
- प्रताप सरनाईक, आमदार व संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजक
>न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करताना, हिंदू संस्कृतीप्रमाणे दहीहंडी सण साजरा केला.
- रवींद्र फाटक, आमदार,
संकल्प मंडळ आयोजक