घरपट्टीवरील चक्रवाढ व्याज रद्द करावे
By admin | Published: April 19, 2017 12:27 AM2017-04-19T00:27:52+5:302017-04-19T00:27:52+5:30
महापालिकेच्या प्रशासनाने थकीत घरपट्टी भरण्यासाठी योजना सुरू करावी तसेच थकीत घरपट्टीवरील चक्रवाढ व्याज रद्द करावे, अशी मागणी भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटने केली आहे.
भिवंडी : महापालिकेच्या प्रशासनाने थकीत घरपट्टी भरण्यासाठी योजना सुरू करावी तसेच थकीत घरपट्टीवरील चक्रवाढ व्याज रद्द करावे, अशी मागणी भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटने केली आहे.
शहरात मोठ्या संख्येने मजूर राहतात. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता व पाणीपट्टीसह इतर कराची थकबाकी वाढत आहे. अशावेळी हे थकीत कर वसुलीसाठी प्रशासनाने नागरिकांसाठी योजना जाहीर करावी. परंतु थकबाकीवरील चक्रवाढ व्याज रद्द करावे. या करवसुलीसाठी नियमानुसार नोटीस जारी कराव्यात,वेळ पडल्यास गुन्हे नोंदवावे. परंतु थकीत करांवरील चक्रवाढ व्याज रद्द करावे त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन नागरिकांना देखील कर भरणे सोयीचे होईल अशा मागणीचे पत्र भिवंडी डेव्हलपमेंट फ्रटंचे निमंत्रक फाजील अन्सारी यांनी आयुक्तांना दिले आहे.
सध्या भुयारी गटार फेस-२ या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून त्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे,असा आरोप करीत अन्सारी यांनी या प्रकल्पाच्या बांधकामाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी. कंत्राटदाराकडून अपेक्षित कामे करून घ्यावीत. शहराच्या विकासासाठी सरकारने २००६ ते २०१३ पर्यंत आलेल्या १ कोटी ३५ लाखाच्या निधीतून विविध कामे केली. त्यापैकी बनविलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
अशा तक्रारी करत अन्सारी यांनी आयुक्त योगेश म्हसे यांना पत्र देऊन सुधारणा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, झालेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी तत्कालीन आयुक्त व महापौरांची नार्कोटेस्ट करावी,असा सल्ला दिला आहे. (प्रतिनिधी)