उल्हासनगरातील मोर्यानगरी रस्ता गेल्या १० वर्षांपासून अर्धवट, नागरिक हैराण
By सदानंद नाईक | Published: October 20, 2024 07:03 PM2024-10-20T19:03:33+5:302024-10-20T19:03:58+5:30
उल्हासनगर अंतर्गत वाहतुकीची कोंडी सोडण्यासाठी लिंक रस्त्याची संकल्पना मांडण्यात आली.
उल्हासनगरअंतर्गत वाहतुकीची कोंडी सोडण्यासाठी लिंक रस्त्याची संकल्पना मांडण्यात आली. २५ वर्षांपूर्वी महापालिकेने श्रीराम चौक मार्गे व्हिटीसी ग्राऊंड मोर्यानगरी रस्ता बनवून मार्केट परिसरातील जड वाहतूक या लिंक रस्त्याने वळती केली. लिंक रस्त्याचा अर्धा की.मी. लांबीचा भाग आताच्या कल्याण महापालिका हद्दीतून व त्यापूर्वीच्या आशेळे, माणेरे गाव हद्दीतून गेला आहे. हा अर्धा की.मी. लांबीचा रस्ता दुरुस्त करण्याचे काम आतापर्यंत उल्हासनगर महापालिकेने केले. मात्र रस्ता पुनर्बांधणीवरून वाद निर्माण झाल्याने, रस्ता गेल्या १० वर्षांपासून अर्धवट असवस्थेत पडला. दरम्यान एमएमआरडीए कडून स्थानिक आमदाराने निधी आणल्याचे सांगून ३ वर्षांपूर्वी धुमधडाक्यात रस्त्याचे भूमिपूजन झाले. त्यानंतर विरोधी पक्षांनेही भूमिपूजन केले होते. मात्र रस्त्याचे काम पूर्ण न होता, आजही अर्धवट स्थितीत आहे.
मोर्यानगरी रस्ता व आशेळे, माणेरे गाव कल्याण पूर्व मतदारसंघात येतो. या मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड असून गेल्या १० वर्षात त्यांना या रस्त्याचे काम पूर्ण करता आले नाही. अशी टीका त्यांचे विरोधक करीत आहेत. मोर्यानगरी रस्त्या प्रमाणे मतदारसंघात येत असलेल्या इतर गावातीळ रस्त्याची अशीच दुरावस्था झाल्याची टीकाही यानिमित्ताने होत आहे. मोर्यानगरीचा रस्ता पूर्ण झाल्यास, शहरातील मार्केट परिसरातील जड वाहतूक या लिंक रस्त्याने वळणार आहे. परिणामी शहर पूर्वेत होणारी वाहतूक कोंडीची समस्या निकाली लागण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.