मराठीमध्ये लिहिलेली बहुतांश आत्मचरित्र खोटी; ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचा दावा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 14, 2024 12:44 PM2024-04-14T12:44:22+5:302024-04-14T12:44:41+5:30
"मला शिक्षकांच्या कार्यक्रमाला जायला हर्ष होतो कारण तिथे लबाडी नसते, पाप नसते"
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मराठीमध्ये लिहिलेली बरेचसे आत्मचरित्र खोटी असतात पण याला पुरावा नाही असे वक्तव्य ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले. माजी मुख्याध्यापक अरूण जोशी यांनी लिहिलेले त्यांचे शैक्षणिक आत्मकथन 'घडताना, घडविताना' तसेच, शिक्षिका आशा जोशी यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनपर लेख व ललित लेख यांचा समावेश असलेले 'जे पाहिलं ते, जे वाटलं ते ' या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवारी श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर येथे बागवे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर, माजी शिक्षणाधिकारी एल्.पी. माळी, माजी सहसंचालक एस्.सी.इ.आर.टी. पुणेचे अरूण ठाकरे, वर्तक नगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षक निवृत्त झाला तरी त्याला प्रवृत्त करणारे शिष्य असतात हे नमूद करताना बागवे यांनी त्यांनी ज्ञानेश्वरीचा अकरावा अध्याय सांगितला. ते पुढे म्हणाले की, मला शिक्षकांच्या कार्यक्रमाला जायला हर्ष होतो कारण तिथे लबाडी नसते, पाप नसते. महाविद्यालयीन प्राध्यापकांपेक्षा मला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक जास्त आवडतात कारण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांकडे मातीचे गोळे आलेले असतात आणि त्याला आकार देण्याचे काम ते करतात. महाविद्यालयीन प्राध्यापकांकडे मात्र सिमेंटचे गोळे येतात. मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो आणि याचा मला अभिमान आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या शाळेतल्या वर्गातील मास्तरांची आठवण सांगितली. माझ्या शिक्षकांनी मला दृष्टी दिली. विद्यार्थ्यांना दृष्टी देण्याचे काम देखील शिक्षकांचे असते. जो विद्यार्थ्यांच्या मनाच्या शेतीची मशागत करतो तो शिक्षक असतो. शिक्षक हा निवृत्तीनंतर देखील शिक्षकच असतो असे त्यांनी शेवटी नमूद केले.