कोविडमुळे अनाथ झालेली सर्वाधिक बालके ठाण्यात; यशोमती ठाकूर राज्यभर करणार दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 07:57 AM2021-06-15T07:57:32+5:302021-06-15T07:57:43+5:30
कोविड १९ चा सर्वाधिक परिणाम महिला व बालकांवर झाला. तसेच, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मनोधैर्य योजना लवचिक केली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोविड - १९मुळे अनाथ झालेल्या बालकांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार असून, त्याचा प्रारंभ ठाण्यातून करीत आहे. या अनाथ बालकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या, अडीअडचणी समजल्या. त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठाणे जिल्ह्यात अनाथ बालकांची संख्या सर्वाधिक ४२ असून, ही निश्चित गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केले.
ठाकूर म्हणाल्या की, कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या मागे सरकार मायबाप म्हणून उभे आहे. या अनाथ मुलांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान सरकार देणार आहे. ही मुले २१ वर्षांची झाली की, ते पैसे त्यांना मिळतील. बालसंगोपन योजनेतील पैसे कसे वाढवता येतील, बालकामगार, बालविवाह हे कसे रोखता येतील, याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत. अनाथ मुलांचा शोध घेत असून, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. अनाथ बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी टास्क फोर्स तयार केला आहे व ते दर १५ दिवसांनी पाठपुरावा करतील. तसेच, ज्या अनाथ मुलांना कोणीच नाही अशांची चाईल्ड केअर इन्स्टिट्यूटमध्ये व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कोविडची तिसरी लाट येऊ नये अशी आम्ही आशा करतोय. तिसरी लाट लहान मुलांवर परिणाम करणार असेल तर अंगणवाडी सेविकांना तसे प्रशिक्षण दिले जाईल. सरकारने याबाबत पूर्ण तयारी केली आहे. आशा वर्कर्सचे मानधन वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोविड १९ चा सर्वाधिक परिणाम महिला व बालकांवर झाला. तसेच, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मनोधैर्य योजना लवचिक केली जाईल. तसेच,
‘दिशा’ कायद्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. तसेच महिलांनी स्वतःवरील अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.