‘वास दांडिया’ला यंदा मोठ्यांची सर्वाधिक पसंती
By admin | Published: September 29, 2016 03:48 AM2016-09-29T03:48:35+5:302016-09-29T03:48:35+5:30
नवरात्र जवळ आल्याने विविध प्रकारच्या आणि रंगीबेरंगी दांडियांनी ठाण्यातील बाजारपेठ सजली आहे. वास दांडियाची कमी झालेली मागणी यंदा पुन्हा वाढली असून सध्या
- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
नवरात्र जवळ आल्याने विविध प्रकारच्या आणि रंगीबेरंगी दांडियांनी ठाण्यातील बाजारपेठ सजली आहे. वास दांडियाची कमी झालेली मागणी यंदा पुन्हा वाढली असून सध्या मोठ्यांची पसंती याच दांडियाला असल्याचे बाजारपेठेत दिसून येते. एकीकडे वास दांडियाची मागणी वाढली असताना दुसरीकडे फॅन्सी दांडियाची क्रेझ मात्र कमी झाली आहे आणि ही आवड आता फक्त लहान मुलांपुरतीच मर्यादित राहिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
नवरात्रीचे नऊ रंग उधळण्यासाठी सारेच सज्ज झाले आहेत. नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या दांडियाराससाठी सर्व दांडियाप्रेमी उत्सुक आहेत. बाजारपेठेतील खरेदीला उधाण आले आहे. दांडिया राससाठी प्रामुख्याने खरेदी केल्या जाणाऱ्या दांडियाची बाजारपेठेत ठिकठिकाणी विक्री सुरू आहे. स्टेशन रोड, होलसेल मार्केट, जांभळी मार्केट यासारख्या ठिकाणी दुकाने दांडियांनी सजली आहे. याठिकाणी बांबूपासून तयार करण्यात आलेला वास दांडिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. वास दांडिया १५ रुपयांना जोडी या दराने मिळत आहे. या दांडिया खेळताना तुटत नाहीत आणि टिकाऊ असल्याने तरुण्तरुणी याच दांडियांना प्राधान्य देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फॅन्सी दांडियांचे आकर्षण फक्त लहान मुलांनाच आहे आणि त्यातही तरुणतरुणी केवळ वेशभूषा स्पर्धेसाठी या दांडियांची खरेदी करीत असल्याचे विक्रेते जितेंद्र पटेल यांनी सांगितले. फॅन्सी दांडियांमध्ये बांधणी, अजमेरी, डिस्को व्हाइट, नवरंग डिस्को, गोल्डन डिस्को, बेअरिंग रिंग, सिल्व्हर बेअरिंग बॉम्बे, व्हर्टिकल स्मॉल मिक्स, व्हर्टिकल बिग मिक्स, क्रॉस रो, हाफ कट, संखेडा, टू कलर, थ्री कलर, लाल पिवळा यांसारखे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यात सॅटिन तिरंगा, न्यू डिस्को, सिल्व्हर पेन्सिल, व्हर्टिकल स्मॉल, सुपर कट हे नवीन प्रकार यंदा आले आहेत. या दांडिया २५ पासून ६० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. बेअरिंग कट दांडिया हलक्या असल्याने या दांडियाला तरुणांची पसंती आहे.
फॅन्सी दांडियांकडे मुले आणि तरुणवर्गही आकर्षित आहे. यंदा दांडियाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तीन वर्षांत वास दांडियाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. त्यामुळे यंदा ८० टक्के वास दांडिया आणि २० टक्के फॅन्सी दांडिया बाजारात दिसत असल्याचे पटेल म्हणाले.