मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाला मिळणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:47+5:302021-07-11T04:26:47+5:30
कल्याण : डोंबिवलीतील मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाच्या कामाची शनिवारी एमएमआरडीएचे आयुक्त गोविंद राज यांनी पाहणी केली. या पुलाचे डोंबिवली आणि ...
कल्याण : डोंबिवलीतील मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाच्या कामाची शनिवारी एमएमआरडीएचे आयुक्त गोविंद राज यांनी पाहणी केली. या पुलाचे डोंबिवली आणि भिवंडी या दोन्ही दिशेने जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच या कामाला गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी राज यांच्याकडे कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी ही पाहणी केली. यावेळी म्हात्रे, महापालिकेचे नगररचनाकार राजेश मोरे उपस्थित होते.
मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाचे काम २०१६ पासून एमएमआरडीए कंत्राटदारामार्फत करीत आहे. हा खाडीपूल मार्गी लागल्यास डोंबिवलीमार्गे ठाण्याला अवघ्या २० मिनिटांत पोहोचता येणार आहे. पुलाच्या कामात काही भूसंपादनाचे प्रश्न होते. ते आता निकाली निघाले आहेत. पुलाचे डोंबिवली आणि भिवंडी या दोन्ही दिशेने जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. लॉकडाऊनमुळे या कामाची गती संथ झाली होती. मात्र, अनलॉकमध्ये या कामाला गती देण्यात आली आहे. आणखी वर्षभरात या पुलाचे काम पूर्णत्वास येऊ शकते.
दरम्यान, या पुलाच्या कामाला गती देण्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर सप्टेंबर २०२० मध्ये यासंदर्भात बैठक घेऊन कामाची प्रत्यक्ष पाहणीही केली होती.
‘तिसऱ्या टप्प्याची निविदा काढा’
मोठागाव ठाकुर्ली-माणकोली पुलाच्या बरोबरीने रिंग रोडच्या मोठागाव ठाकुर्ली ते दुर्गाडी या तिसऱ्या टप्प्याचे कामही एमएमआरडीए करणार आहे. या टप्प्यासाठी आवश्यक असलेले ८० टक्के भूसंपादन झाले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्याची निविदा काढून कामाला सुरुवात करावी, अशी सूचना म्हात्रे यांनी राज यांना केली आहे.
------------------