धसईमध्ये कोरोनामुळे आई, मुलाचा मृत्यू; बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा करणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 09:16 AM2021-03-20T09:16:54+5:302021-03-20T09:17:11+5:30
नागरिक मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, लग्नसमारंभात गर्दी करणे, यामुळे चार दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण सापडले आहेत.
मुरबाड : गेेली दोन महिने तालुक्यात कमी झालेला कोरोना पुन्हा सक्रिय झाला आहे. धसईत एकाच दिवशी आई, मुलाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही येथील कोविड सेंटर बंद केले होते. चार दिवसांपूर्वी पाच रुग्ण सापडल्याने त्यांच्यावर बदलापूर, कल्याण येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते; परंतु दोन दिवसांत रुग्णांची संख्या ३२ वर गेल्याने बंद केलेले कोविड सेंटर सुरू करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांनी दिली.
नागरिक मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, लग्नसमारंभात गर्दी करणे, यामुळे चार दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेला मुलगा व होम क्वारंटाइन असलेल्या आईचा कोरानाने मृत्यू झाला. तर, शुक्रवारी सात रुग्ण आढळले.
नव्याने सापडणारे रुग्ण बदलापूर व कल्याण येथील कोविड सेंटरमध्ये जाण्यास तयार होत नाहीत. तरीही तिघांना बदलापूरला पाठवले आहे. २२ जण होम क्वारंटाइन आहेत. दरम्यान, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केल्यास प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश येऊ शकेल, असे बनसोडे यांनी सांगितले.