प्लास्टर पडून आईचा मृत्यू, ४ मुली जखमी; भाईंदरमध्ये पहाटे घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:26 AM2023-07-15T10:26:25+5:302023-07-15T10:27:26+5:30
या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलास सव्वाआठ वाजता मिळाली.
मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन, पातान बंदर भागात शुक्रवारी पहाटे एका घराच्या छताचे प्लास्टर कोसळून आईचा मृत्यू झाला. तर, तिच्या चार मुली जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर घर रिकामे करण्यात आले आहे.
मच्छीमार डेनिस बोर्जिस यांच्या एकमजली घरातील तळमजल्यावर त्यांची पत्नी सुनीता (४६) ह्या सोफ्यावर झोपल्या होत्या. तर, मुली स्नेहल (२५), श्वेता (१७), सानिया (१३) आणि डेन्सी बॉर्जिस (२२) ह्या खाली झोपल्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजता छताचे प्लास्टर कोसळले. त्यात सुनीता यांचा मृत्यू झाला. तर, चार मुली जखमी झाल्या. डेन्सी हिला दुखापत झाल्याने तिला स्टेला मॉरिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, अन्य तिघींवर उपचार करून सोडण्यात आले.
या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलास सव्वाआठ वाजता मिळाली. अपर तहसीलदार नीलेश गौंड, तलाठी अनिता पाडवी, पोलिस निरीक्षक दादाराम कारंडे, अग्निशमन दलप्रमुख प्रकाश बोराडे, अग्निशमन केंद्र अधिकारी जगदीश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हे घर २० ते २२ वर्षे जुने असून तीन वर्षांपूर्वी त्याची दुरुस्ती केल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. अपर तहसीलदार यांच्या निर्देशानंतर खबरदारी म्हणून घर रिकामे करण्यात आले आहे.