बालकाला जीवदान देत आईने मृत्यूला कवटाळले, म्हसातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 11:41 AM2020-10-24T11:41:47+5:302020-10-24T11:42:20+5:30
प्रीतीचे गेल्या वर्षी मार्च महिन्यात लग्न झाले होते. ऑगस्टमध्ये तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
मुरबाड : तालुक्यातील म्हसा परिसरातील तागवाडी येथील प्रीती रमेश मेंगाळ (२२) ही आदिवासी महिला आपल्या चार महिन्यांच्या तान्हुल्याला आपल्या घरात दूध पाजत असताना वीज पडून तिचा मृत्यू झाला. बाळ सुखरूप असून या तान्हुल्याचा आक्रोश पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रीतीचे गेल्या वर्षी मार्च महिन्यात लग्न झाले होते. ऑगस्टमध्ये तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. कोरोनामुळे रोजगारावर संक्रांत आली असताना सध्या शेतीची कामे सुरू होती. त्यामुळे रोजगार मिळत होता. परंतु, परतीच्या पावसाने पिकांची नासाडी झाल्याने शेतीतून मिळणारा रोजगारही बंद झाल्याने कुठे काम मिळते का, याच्या शोधात प्रीती होती. रोजगार न मिळाल्याने ती घरी आली. दरम्यान, परिसरात जोरदार पाऊस आणि विजेचा कडकडाट असल्याने ती घरी आली व बाळाला दूध पाजत पती रमेशशी बोलत होती. तेवढ्यात, घरासमोरून विजेचा लखलखता गोळा आपल्याकडे येत आहे, असे प्रीतीला समजताच तिने आपल्या कुशीत असलेले बाळ बाजूला फेकले. तेवढ्यात, विजेचा धक्का तिला बसताच तिचा जागीच मृत्यू झाला.
पंचनामा करण्याचे आदेश
ही घटना आमदार किसन कथोरे यांना कळताच त्यांनी जिल्हाधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तसेच तहसीलदार अमोल कदम यांना परिस्थितीची पाहणी करून रीतसर पंचनामा करण्याचे आदेश दिले. या महिलेच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्तीतून मदत देण्याचे आश्वासन दिले.