तुझ्याविना गं आई मला मुळीच करमत नाही…; अनाथाश्रमात सोडलेल्या लहानग्याने संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 09:13 AM2024-10-10T09:13:50+5:302024-10-10T09:14:13+5:30
आईच्या विरहाने व्याकूळ ७ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरड्याने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : वडील वारल्यानंतर आईने दुसऱ्याशी घरोबा केला असता, दोन मुलांना अनाथाश्रमात ठेवले होते, परंतु आईच्या विरहाने व्याकूळ ७ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरड्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे.
नालासोपारा येथील अब्दुल सय्यद याच्याशी प्रीती हिने लग्न केले होते. लग्नानंतर तिचे नाव फरिदा झाले. अब्दुलपासून तिला चार मुले झाली, परंतु अब्दुल सय्यद याच्या मृत्यूनंतर २९ वर्षांच्या फरिदासमोर मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तिने दुसऱ्याशी घरोबा केला. दुसऱ्यासोबत घरोबा केल्यानंतर तिने २६ जूनला तिच्या ७ वर्षे ७ महिन्याच्या अरमान व ११ वर्षांचा रेहान यांना भाईंदरच्या उत्तन-पाली येथील सेवा कुटीर या अनाथाश्रमात ठेवले. दीड वर्षाचे आणि ४ वर्षे वयाची तिची दोन मुले फरिदा हिने स्वतःसोबत ठेवली.
आईजवळ राहण्याचा हट्ट
फरिदा हिने २६ जून रोजी अरमानला आश्रमात ठेवले तेव्हा तो खूप रडला होता. फरिदा तीन वेळा आश्रमात मुलांना भेटायला गेली. अरमान तुझ्यासोबत राहायचे आहे, असा हट्ट धरून रडत असे. आश्रमात २१ मुले आहेत. ८ ऑक्टोबरला सकाळी अरमान न दिसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. परिसरातील विहिरीत अरमानचा मृतदेह आढळला. भाईंदर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाराम करांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. उत्तन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून स.पो.नि. सपन बिश्वास तपास करत आहेत.